मुंबई : दोन महिन्यापासून मणिपूर येथे हिंसाचार सुरु आहे. यावर केंद्र सरकार गंभीर नाही. पंतप्रधान या विषयावर बोलण्यास तयार नाहीत, त्यांचे गप्प बसने चिंताजनक असल्याचे प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी म्हटले आहे. काही दिवसापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मणिपूरला भेट दिली होती. मात्र त्याचा फारसा प्रभाव दिसला नाही. मणिपूरमधील हिंसाचाराला आळा घालण्यासाठी तेथील राज्यसरकार बरखास्त करावे अशी मागणी राज्यपालांच्या माध्यमातून राष्ट्रपतींना प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष नसीम खान यांनी केली.
काँग्रेसचे शिष्टमंडळ राज्यपालांच्या भेटीला : काँग्रेस नेते नसीम खान यांच्या नेतृत्वाखाली अल्पसंख्याक गट, ख्रिश्चन संघटना आणि आदिवासी नेत्यांनी राजभवन येथे राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेतली. त्यांनी मणिपूरमधील सद्य परिस्थितीबद्दल राष्ट्रपतींना माहिती दिली. राज्य अल्पसंख्याक कमिशनच्या माजी उपाध्यक्ष जेनेट डिसोजा, सेवानिवृत्त प्राचार्य सीमोन लोपेज, धर्मगुरु रेव्हरंड जॅकोब थॉमस, उत्तर पूर्व मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष अब्राहम रॉय मणी यांची उपस्थिती होती.
काय म्हटले निवेदनात : जवळजवळ दोन महिन्यापेक्षा जास्त काळापासून मणिपूरमध्ये मोठी मानवी शोकांतिका पाहायला मिळत आहे. वांशिक गटांमधील हिंसाचारामुळे मणिपूरमधील लोकांचे जीवन उद्ध्वस्त झाले. राहती घरे देखील जाळुन टाकण्यात आली. रहिवाशांना त्यांचे राहते स्थळ सोडण्यास बळजबरी केली जात आहे. आपला जीव मुठीत घेऊन जनता जगत आहे. राज्यातील इंटरनेट सेवा ठप्प आहे. आपले लोक एकमेकांच्या विरोधात उभे राहिल्याचे दुःख होत आहे. गेल्या अनेक दहशकापासून विविध जातीधर्माचे लोक एकोप्याने राहत आले आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
विस्थापितांची संख्या १२ हजाराच्यावर : गेल्या दोन महिन्या झालेल्या हिंसाचारामुळे २०० पेक्षा जास्त प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त झाली आहे. विस्थापितांची संख्या १२ हजाराच्यावर गेली आहे. मदतीसाठी वारंवार केंद्र सरकारकडे विनंती करूनही मदत मिळत नाही. या सर्व गोष्टींचा विचार करता मणिपूरमध्ये तात्काळ राष्ट्रपती राजवाट लागू करण्याची आवश्यकता आहे. काँग्रेसच्या भावना राष्ट्रपतींना आपल्या माध्यमातून कळवाव्या अशी आमची भावना असल्याचे नसीम खान यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - Manipur CM : मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांचे फाडलेले राजीनामा पत्र व्हायरल, समर्थक अडवून म्हणाले..