मुंबई - मुंबईमध्ये गेले वर्षभर कोरोनाचा प्रसार आहे. कोरोनाची दुसरी लाट आली असून ती ओसरत आहे. गेल्या वर्षभराच्या दरम्यान राज्यात १० वर्षाखालील १ लाख ७३ हजार ८५५ बालकांना कोरोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले आहे. राज्यात तिसरी लाट येण्याची शक्यता असल्याने राज्य सरकार सतर्क झाले असून त्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे.
'इतक्या' बालकांना कोरोनाची लागण
राज्यात मागील वर्षाच्या मार्चपासून कोरोनाचा प्रसार सुरु झाला. गेल्या वर्षभराच्या काळात ५६ लाख ३५ हजार ११९ नागरिकांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी ९१ हजर ३४१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ५२ लाख ४१ हजार ८३३ रुग्ण बरे झाले असून ३ लाख १५ हजार ४२ सक्रिय रुग्ण आहेत. यामध्ये ० ते १० वयोगटातील १ लाख ७३ हजार ८५५ बालकांना तसेच १० ते २० वयोगटातील ४ लाख ४०० मुलांना कोरोनाची लागण झाली आहे. एकूण रुग्णांच्या संख्येत १० वयोगटाखालील बालकांचे प्रमाण ३.०९ टक्के तर १० ते २० वयोगटातील मुलांचे प्रमाण ७.११ टक्के आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
टास्क फोर्स
राज्यात सध्या कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. कोरोना विषाणूमध्ये होणारे जनुकीय बदल आणि उत्परिवर्तनामुळे संभावित तिसरी लाट आल्यास त्यामध्ये लहान मुलांना कोरोना संसर्गाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यापासून लहान मुलांचा बचाव आणि आवश्यक उपचार पद्धती विकसीत करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांचा टास्क फोर्स नेमण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. रविवारी मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील बालरोग तज्ज्ञांशी संवाद साधून संभाव्य तिसरी लाट आल्यास लहान मुलांच्या उपचाराबाबत चर्चाही केली केली होती. लहान मुलांमधील कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी उपचार पद्धती विकसीत करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या या विशेष कृती दलात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद, नागपूर येथील तज्ज्ञांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
डॉ. सुहास प्रभू टास्क फोर्सचे अध्यक्ष
कोरोना संसर्गाच्या लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ज्ञांच्या विशेष कार्यदल (टास्क फोर्स) डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला आहे. यामध्ये 13 तज्ज्ञ सदस्य असून वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालक त्याचे सदस्य सचिव आहेत. या टास्क फोर्समध्ये डॉ. विजय येवले, डॉ.बकुल पारेख, डॉ. बेला वर्मा, डॉ. सुधा राव, डॉ. परमानंद अंदनकर, डॉ. विनय जोशी, डॉ. सुषमा सावे, डॉ. जितेंद्र गव्हाणे, डॉ, प्रमोद जोग, डॉ. आरती किन्नीकर, डॉ. ऋषिकेश ठाकरे, डॉ. आकाश बंग यांचा सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांच्या स्वाक्षरीने नुकताच शासन निर्णय जाहीर केला आहे.
हेही वाचा-राज्यात १५ दिवसांचा लॉकडाऊन वाढणार ?, काही ठिकाणी शिथिलता