मुंबई - कोरोना आणि लॉकडाऊनमुळे राज्यात पुन्हा रक्ताचा तुडवडा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्या राज्यातील सर्व रक्तपेढ्यांमध्ये 8 ते 10 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा आहे. त्यामुळे राज्य रक्त संक्रमण परिषदेने सर्व सेवाभावी संस्थांना पत्र लिहीत छोटी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याच्या सूचना केल्या आहेत.
राज्यात अंदाजे 350 रक्तपेढ्या असून या रक्तपेढ्यांमध्ये कमीतकमी 15 ते 20 दिवस पुरेल इतका रक्तसाठा असतो. तर रक्ताची दररोज गरज ही मोठी असते. दिवसाला राज्यात 4 ते 5 हजार युनिट रक्ताची मागणी असते. मात्र, लॉकडाऊनमध्ये अपघात कमी झाले असून अनेक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे रक्ताची मागणीही कमी झाली आहे. मात्र इमर्जन्सी सेवेत आणि थॅलेसीमियाच्या रुग्णांसाठी रक्ताची मागणी कायम असते. त्यामुळे आजच्या घडीला दोन ते अडीच हजार युनिट रक्तसाठा लागतो, अशी माहिती राज्य रक्त संक्रमण परिषदेचे सहायक संचालक डॉ. अनिल थोरात यांनी दिली आहे.
मागणी कमी असतानाही साठा मात्र त्या तुलनेत कमी असल्याने अडचणी येत आहेत. कारण लॉकडाऊन आणि कोरोनाच्या भीतीने रक्तदान शिबिरे बंद असून वैयक्तिक स्तरावरही रक्तदाते पुढे येत नाहीत. त्यामुळे सध्या राज्यात 8 ते 10 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा असून पुढे लॉकडाऊन आणखी वाढणार आहे. तर, पावसाळा सुरू होणार असल्याने रक्तदान कमी होणार आहे. त्यात पावसाळ्यात इतर साथीच्या आजारांचीही भर पडत असते. तेव्हा येत्या काळात रक्तटंचाई निर्माण होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व सेवाभावी संस्थाना पत्र पाठवत छोटी रक्तदान शिबिरे आयोजित करण्याचे आवाहन करण्यात आल्याची माहिती डॉ. थोरात यांनी दिली. तसेच, रक्तदात्यांनीही न घाबरता कोरोनाच्या दृष्टीने सर्व काळजी घेत रक्तदानासाठी पुढे यावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.