मुंबई - महापालिकेच्या सन २०१९-२० च्या ३० हजार ६९२ कोटींच्या अर्थसंकल्पाला आज (बुधवारी) स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी दिली जाणार आहे. महापालिका आयुक्त अजोय मेहता यांनी सत्ताधारी शिवसेनेच्या वचननाम्यातील महत्त्वाच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केले होते. मात्र, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वचननाम्याच्या पूर्ततेसाठी शिवसेनेकडून अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केल्याने अर्थसंकल्पात वाढ होणार आहे.
महापालिका आयुक्तांनी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांना मागील वर्षापेक्षा १२.६० टक्क्यांनी वाढ केलेला आणि ६.६० कोटी शिल्लकीचा अर्थसंकल्प सादर केला होता. महापालिकेचा मुख्य उत्पन्नाचा स्रोत असलेला जकात बंद झाल्याने अर्थसंकल्पाचा आर्थिक डोलारा डगमगला. मालमत्ता क्षेत्रात आलेल्या आर्थिक मंदीची मालमत्ता कर खात्याला मोठी झळ बसली. ती भरून काढण्यासाठी सेवा सुविधांचा आकार आणि प्रवेश शुल्क आकारण्याचा मानस आयुक्तांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना याचा फटका बसणार आहे.
आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी विविध उपाययोजना करताना आणि मुंबईकरांना अधिक पायाभूत सुविधा देण्यासाठी यापुढे प्रशाकीय, आस्थापना खर्चात कपात करण्याचा व त्यावर नियंत्रण आणण्याचा उपाय सुचवला आहे. त्यामुळे खर्चात बचत होईल, असा त्यांचा दावा आहे. याशिवाय पाणी, रस्ते, पूल, आरोग्य, उद्याने, मलनिःसारण वाहिन्या आदींवर भरीव तरतूद केली आहे. मात्र, सत्ताधारी शिवसेनेच्या वचननाम्यातील तरतुदी अर्थसंकल्पातून वगळण्यात आल्या आहेत. आगामी निवडणुकीच्या तोंडावर याचा फटका बसू नये, यासाठी त्यांची पूर्तता करण्यासाठी स्थायी समितीत विशेष तरतूद करण्याच्या सूचना शिवसेनेच्या सदस्यांनी केल्या आहेत. या सर्व सूचना मंजूर करून घेण्याचे शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत.
अर्थसंकल्प १ मार्चला महापालिका सभागृहात -
स्थायी समितीच्या विविध सूचनांनंतर अर्थसंकल्प १ मार्चला महापालिका सभागृहापुढे मंजुरीसाठी ठेवण्यात येईल. सर्वपक्षीय गटनेते या अर्थसंकल्पावर चर्चा करतील आणि नंतर तो आचार संहितेपूर्वी मंजूर करण्यात येईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.