शिर्डी - (अहमदनगर) प्रसिद्ध भोजपुरी अभिनेता खेसारी लालनं शिर्डीत साईबाबांच्या समाधीला भेट दिली. निंदा करणाऱ्याचं आभार मानत त्यानं सर्वजण सुखी झाले तरच आम्ही कलाकार लोकांचं मनोरंजन करु शकू, असं म्हटलं. माणसाला जेव्हा लोक नावं ठेवत असतात, त्याचे दोष सांगत असतात तेव्हाच त्याच्या जीवंत राहण्याला अर्थ आहे, असं तो म्हणाला. त्याचा कालचा इव्हेन्ट का रद्द झाला इथं पासून ते त्यानं साईबाबांकडे काय मागितलं असे अनेक प्रश्न त्याला विचारण्यात आले.
"आज साईबाबांना माझ्यासाठी काहीच मागण्यासाठी आलो नाहीय. साईबाबांनी एवढं दिलं आहे की त्यांचा दर्शनासाठी येण्यासाठी वेळ मिळत नाही. नवीन वर्ष देशातील जनतेला सुखाचं आणि समृद्धीचं जावो एवढीच प्रार्थना साई चरणी केली," असं भोजपुरी चित्रपटाचा प्रसिद्ध अभिनेता खेसारी लाल यादव यांनी शिर्डीत म्हंटलय.
जमशेदपुर येथे खेसारी लाल यादव आणि शिल्पी राघवानी यांचा 31 डिसेंबर रोजी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र हा कार्यक्रम अचानक रद्द करण्यात आला, यावर बोलतांना खेसारी लाल म्हणाला की , "माझ्या कार्यक्रमाला 3 ते 4 लाख लोक उपस्थिती राहतात. कार्यक्रम होत असलेल्या ठिकाणी जागा अपुरी असली, तर गर्दीला सांभाळणं अवघड होतं. त्यामुळे तिथं कुठलाही अनुचित प्रकार घडायला नको म्हणून येथील प्रशासनानं माझ्या कार्यक्रमाला परवानगी दिली नसेल. भोजपुरी सेलिब्रिटी मॅनेजमेंट कंपनीच्या वतीनं माझा जमशेदपुर येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र त्यांच्याकडून मला कळवण्यात आलं की प्रशासनाकडून तुमच्या कार्यक्रमाला परवानगी नाकारण्यात आल्यानं कार्यक्रम रद्द करण्यात आलाय. त्यामुळे मी आज शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी निघून आलो."
"मी काही तरी आहे म्हणूनच मला सोशलमीडियावर लोक ट्रोल करतायत. त्यामुळेच मी अजून काही तरी बनण्याचा प्रत्यन करतोय. ज्यावेळी लोक मला नाव ठेवण बंद करतील त्यावेळी मला वाटेल की मी संपलो की काय म्हणून , जो पर्यंत जिवंत आहे तो पर्यंत लोक बदनाम करत राहतील. जिवंत माणसाला लोक रडवत राहतात मेलेल्या माणसाला कोणी बोलत नाही, " असा उपरोधी टोला यावेळी खेसारी लाल यादव यांनी बदनामी करणाऱ्यांना लगावलाय.
नवीन वर्षा निमित्ताने सर्व सामान्य भाविकांसह राजकीय नेते तसेच अभिनेते साई चरणी नतमस्क होतायात. भोजपुरी चित्रपटाचे प्रसिद्ध अभिनेता खेसारी लाल यादव यांनी आज नवीन वर्षा निमित्ताने शिर्डीत येवून साई समाधीचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी साईबाबा संस्थानच्या वतीने यादव यांचा शॉल, साई मूर्ती देवून सत्कार करण्यात आला.