मुंबई - एखादी इमारत धोकादायक असल्याचा कोणी फोन केला, तरी अग्निशामक दल कोणतीही शहानिशा न करता इमारत खाली करते. मात्र, सिटी सेंटर मॉलच्या आगीनंतर मुंबईतील मॉलची तपासणीत करताना अग्निशामक यंत्रणा कार्यरत नसल्याचे निदर्शनास आले आहे. अशा मॉलमध्ये आग लागून जीवितहानी होण्याची भीती असल्याने, हे मॉल तातडीने बंद करावेत. तसेच या ठिकाणी आग लागल्यास अग्निसुरक्षा पालन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी स्थायी समितीत करण्यात आली.
नोटीस दिल्यानंतरही कारवाई नाही -
मुंबईतील सिटी सेंटर मॉलला 22 ऑक्टोबर रोजी आग लागली होती. या आगीदरम्यान मॉलमधील अग्निशामक यंत्रणा कार्यरत नसल्याचे समोर आले आहे. मुंबईमधील इतरही मॉलमध्ये अग्निशामक यंत्रणा कार्यरत नसल्याने त्यांची तपासणी करून कारवाई करण्याचे आदेश स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिले होते. त्यानंतर अग्निशामक दलाने 29 मॉलना नोटीस बजावली आहे. मात्र, या मॉलवर अद्याप कारवाई करण्यात आली नाही. या ठिकाणी आग लागून शेकडो लोकांचा जीव जाण्याची शक्यता असल्याने आधी मॉल बंद करावेत. त्यानंतर मॉलमधील अग्निसुरक्षा यंत्रणा सुरू केल्यावर मॉल सुरू करावे, अशी मागणी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केली. नागरिकांच्या जीवाशी अग्निशामक दल खेळत असल्याने कुठेही आग लागल्यास अग्निसुरक्षा पालन अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी रवी राजा यांनी केली. मॉलची माहिती मागावताना स्थायी समिती अध्यक्षांचे नाव नोटीसमध्ये टाकणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.
मॉल सुरू करण्यासाठी राजकीय दबाव -
सिटी सेंटर मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे असताना हा मॉल दोन दिवसांत सुरू करण्यासाठी काही राजकीय पक्षाचे लोकप्रतिनिधी दबाव आणत असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी केला. आग प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन न करणाऱ्या माॅल्सच्या बाहेर 'हा मॉल अग्निसुरक्षेचे नियम पाळत नाही. त्यामुळे विचार करून मॉलमध्ये प्रवेश करावा', असे फलक लावण्याची मागणी काँग्रेसचे आसिफ झकेरीया यांनी केली.
स्थायी समिती अध्यक्षांनी झापले -
अग्निशामक दलाने वरळीच्या अट्रीया मॉलला नोटीस पाठवली आहे. स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने ही नोटीस पाठवल्याने यावर सदस्यांनी संताप व्यक्त केला. अग्निशामक दल अधिकारी एखादा फोन आला म्हणून भायखळा अंजीर वाडी येथील इमारत खाली करतात. मग ज्या मॉलमध्ये अग्निसुरक्षा यंत्रणा नाही, त्या मॉलला टाळे का लावत नाही, असा प्रश्न स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी उपस्थित केला. नियमांचे पालन केले जात नसताना या मॉलची तपासणी करावी, असे अग्निशामक दलाला वाटत नाही का, तसेच मॉलची पाहणी करतानाच मॉल बंद का करण्यात आले नाहीत, काही घडले असते, तर त्याला जबाबदार कोण, असे प्रश्न उपस्थित करत स्थायी समिती अध्यक्षांनी अग्निशामक दलाला फटकारले आहे.
दोन दिवसात कारवाई -
स्थायी समिती अध्यक्षांच्या नावाने नोटीस देणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा, अशी मागणी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधींनी केली. याबाबत संबंधित अधिकाऱ्याला नोटीस देऊन दोन दिवसांत स्पष्टीकरण मागवण्याचे व नंतर आयुक्तांच्या आदेशाने निलंबनाची कारवाई करण्याचे आश्वासन अतिरिक्त आयुक्त पी. वेलारासू यांनी दिले. ज्या २९ मॉलना नोटीस देण्यात आली आहे. त्याबाबतची माहिती पुढील बैठकीत स्थायी समितीला सादर करू, असे आश्वासनही वेलारासू यांनी दिले.