मुंबई - कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे सतत पुढे ढकलण्यात येणाऱ्या दहावीच्या परीक्षा अखेर रद्द करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने यासंदर्भातील अध्यादेश बावीस दिवसांनी काढला आहे. गुणपत्रक, प्रमाणपत्र आणि ११वीच्या प्रवेशाबद्दल लवकरच निर्देश देण्यात येतील, असे अध्यादेशात नमूद केले आहे. विद्यार्थ्यांसह पालकांनीही यामुळे सुटकेचा निश्वास टाकला आहे.
परीक्षेची तारीख पे तारीख
गेल्यावर्षी कोरोनाचा शिरकाव झाला. यावर प्रतिबंध घालण्यासाठी देशात लॉकडाऊन करण्यात आला. शाळा, महाविद्यालये बंद केली. विद्यार्थ्यांचे आर्थिक वर्ष वाया जाऊ नये, यासाठी ऑनलाइन शिक्षणावर भर दिला होता. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाला. जनजीवन पूर्वपदावर येत असतानाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले. पहिली ते ९ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सरसकट उत्तीर्ण केले. तर दहावी आणि बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्या. बारावीच्या परीक्षा मे महिन्याच्या अखेरीस तर दहावीच्या जून महिन्यात घेणार असल्याचे शिक्षणमंत्र्यांनी जाहीर केले होते. मात्र, सतत तारीख पे तारीख सुरू असल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते.
अकरावी प्रवेशाबाबत लवकरच निर्णय
वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, दोन्ही वर्गांच्या परीक्षा रद्द केल्याची घोषणा शिक्षणमंत्र्यांनी केली. निर्णय कागदोपत्री जाहीर न झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षक संभ्रमावस्थेत होते. काही तांत्रिक अडचणी निर्माण होत होत्या. अखेर शिक्षणमंत्र्याच्या घोषणेनंतर तब्बल बावीस दिवसांनी राज्य शासनाने परीक्षा रद्द करण्याबाबतचा अधिकृत निर्णय घेतला आहे. शालेय शिक्षण विभागाने यासंदर्भातील अध्यादेश प्रसिद्ध केला आहे. दहावीच्या परीक्षा रद्द केल्यामुळे गुणपत्रक, प्रमाणपत्र देण्याबाबत तसेच अकरावीच्या प्रवेशाबाबत लवकरच निर्देश दिले जातील, असे राज्याचे उपसचिव राजेंद्र पवार यांनी काढलेल्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे.
हेही वाचा -नीरव मोदीची मालमत्ता जप्त करण्याचे विशेष न्यायालयाचे आदेश