मुंबई Special story of stones : आपण शाळेत भूगोलाचा अभ्यास केलाच असेल. हा विषय काहींना आवडतो तर काहींना ऑप्शनल वाटतो. याच भूगोलाच्या पुस्तकात आपण खडकांचे, दगडांचे विविध प्रकार अभ्यासले आहेत. मात्र, यातले सर्वच प्रकार आपल्याला प्रत्यक्षात पाहता आणि हाताळता येतातच असं नाही. मुलांना भौगोलिक विषयाची आवड निर्माण व्हावी आणि मुलांमध्ये संशोधन वृत्ती निर्माण व्हावी यासाठी मुंबईतल्या मध्य मुंबई विज्ञान संघ या संस्थेनं चक्क दगडांचं प्रदर्शन भरवलं आहे. या प्रदर्शनात तब्बल 100 हून अधिक दगडांचे प्रकार मांडण्यात आले आहेत. या प्रदर्शनाला नाव देण्यात आलं आहे 'चला डोक्यात दगड भरूया'. मध्य मुंबई विज्ञान संघ या संस्थेचे पदाधिकारी अमेय परब यांनी अशी माहिती दिली.
खडक, खनिजे, जीवाश्मांचे प्रदर्शन : यासंदर्भात ई टिव्ही भारतशी बोलताना डॉक्टर अभिजीत पाटील यांनी सांगितलं की, आपल्याला शाळेत खडक, खनिजे, जीवाश्म असे विषय अभ्यासाला आलेले असतात. अनेकदा हे विद्यार्थ्यांना पुस्तकात चित्रांमध्येच पाहायला मिळतं. याचे सॅम्पल हे शाळेच्या प्रयोगशाळेत अनेकदा उपलब्ध नसतात. मुलांना आपण जे शिकतोय ते प्रत्यक्षात पाहता यावं, जीवाश्म म्हणजे काय? खनिजे म्हणजे काय? खडक म्हणजे काय? हे प्रत्यक्षात पाहून समजून घेता यावं, त्यासाठी आम्ही हे प्रदर्शन आयोजित केलं आहे.
शास्त्रीय कारणासह स्पष्टीकरण : अनेक खनिजे अशी आहेत, जी आपण आपल्या दैनंदिन जीवनात वापरत असतो. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या आपल्याशी संबंध येत असतो. ही खनिजे प्रदर्शनात विद्यार्थ्यांना पाहता येणार आहेत. इथे आम्ही प्रामुख्याने खडकांचे तीन प्रकार मांडलेले आहेत. यात अग्निज खडक, स्तरित खडक आणि रुपांतरित खडक हे जे आपण शाळेत खडकांचे तीन प्रकार अभ्यासले आहेत ते आम्ही इथे प्रदर्शनात मांडले आहेत. आपल्याकडे लोकांमध्ये पाण्यावर तरंगणाऱ्या खडकाबाबत मोठी उत्सुकता असते. या खडकाला शास्त्रीय भाषेत प्युमेस खडक असे म्हणतात. हा खडक पाण्यावर नेमकं का तरंगतो? हे आम्ही या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना शास्त्रीय कारणासह सांगत आहोत. या खडकाचे दोन प्रकार आम्ही या प्रदर्शनात ठेवले आहेत. हा खडक मुलं हाताळतात, स्वतः पाण्यात टाकून तो तरंगताना पाहतात आणि हा दगड नेमका पाण्यावर का तरंगतो याचं शास्त्रीय कारण समजून घेत आहेत, अशी माहिती डॉक्टर अभिजीत पाटील यांनी दिली.
हेही वाचा :