मुंबई - राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्प मांडला आहे. हा महाविकास आघाडीचा पहिला अर्थसंकल्प असून या अर्थसंकल्पात महिलासुरक्षेसाठी खास तरतुदी करण्यात आल्या आहेत.
महिलांच्या सुरक्षेसाठी आणि त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करण्यास सरकार कटीबद्ध असून त्याकरता एक हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. राज्यातील महिलांच्या सुरक्षेसाठी विभागीय स्तरावर महिला आयोगाचे कार्यालय उभारण्यात येणार आहे, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली.
हेही वाचा - महा'अर्थ' संकल्प : जलसंधारणासाठी 'मुख्यमंत्री जलसंधारण योजना'
जिल्ह्याच्या ठिकाणी एका स्वतंत्र महिला पोलीस ठाण्याची निर्मिती केली जाणार असून या ठिकाणी सर्व महिला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. महिला अत्याचारांच्या घटनांवर वचक राहण्यासाठी कठोर कायदे करण्याचा प्रयत्न करणार, असे पवार म्हणाले. महिलांना आणि मुलींना माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देण्याच्या तरतुदी अर्थसंकल्पात करण्यात आल्या.