मुंबई - पोलीस कर्मचाऱ्यांना आरोग्याचा त्रास झाल्यास तर मुंबई आणि महाराष्ट्राच्या स्तरावर एक आरोग्य कक्ष उघडण्यात आला आहे. मुंबई कक्षाचे प्रमुख संयुक्त पोलीस आयुक्त नवल बजाज, तर महाराष्ट्राचे प्रमुख ए. डी. जी. संजीव सिंघल प्रमुख असतील, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
प्रत्येक जिल्ह्यात आपआपल्या जिल्ह्यामध्ये स्वतंत्र आरोग्य कक्ष उभारण्याच्या सूचना संबंधित जिल्ह्यातील पोलीस आयुक्तांना दिल्या असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले.
राज्यात ३ पोलीस कर्मचाऱ्यांचा कोरोनामुळे मृत्यू -
कोरोनाच्या लढाईमध्ये राज्यातील पोलीस अधिकारी आणि कर्मचारी अतिशय कठीण परिस्थितीमध्ये काम करत आहेत. नुकतेच राज्याचे दोन हेड कॉन्टेबल चंद्रकांत पेंदुलकर आणि संदीप सुर्वे यांचे कोरोनाची लढाई लढताना दुर्दैवी निधन झाले. महाराष्ट्र शासन यांच्या पाठीशी आहे. त्यांना प्रत्येकी ५० लाखांची मदत आणि कुटुंबातील व्यक्तीला सरकारी नोकरी देण्यात येईल, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले.
कोरोना विषाणूची बाधा होऊन आज आणखी एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. मुंबई पोलिसांच्या ट्रॅफिक विभागात काम करणाऱ्या शिवाजी सोनावने (56) या पोलीस कर्मचाऱ्याचा कोरोना संक्रमनाशी झुंझत असताना आज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
राज्यात १०७ पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण -
राज्यात लोकांनी लॉकडाऊनचे पालन करावे, म्हणून रस्त्यावर 24 तास पहारा देणाऱ्या राज्य पोलीस खात्यातील 107 पोलिसांना कोरोनाची लागन झाली आहे. यामध्ये 20 पोलीस अधिकारी तर 87 पोलीस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात 7 पोलीस कर्मचारी बरे झाले असून, मुंबई पोलीस खात्यातली 2 जणांचा मृत्यू झाला आहे. अजूनही 98 जणांवर उपचार सुरू आहेत.