मुंबई - कोरोनाबाधित गर्भवती महिलांच्या प्रसूतीसाठी मुंबई महानगरपालिकेकडून विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. नायर रुग्णालयात कोरोनाबाधित महिलांच्या प्रसूतीसाठी वेगळा विभाग करण्यात आला आहे. याठिकाणी 52 कोरोनाबाधित महिला प्रसूतीसाठी दाखल झाल्या असून आतापर्यंत 25 महिलांची सुखरूप प्रसूती करण्यात आली आहे.
मुंबईमध्ये कोरोनाचे सुमारे 6 हजार रुग्ण आहेत. त्यापैकी 200हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. पॉझिटिव्ह आणि क्वारंटाईन रुग्णांची संख्या सतत वाढत असल्याने पालिकेने बहुतेक रुग्णालये, प्रसूती गृहे ताब्यात घेऊन त्यामध्ये कोरोनाच्या रुग्णांवर उपचार केले जात आहेत. त्यामुळे महिलांच्या प्रसूतीबाबत प्रश्न निर्माण झाला होता. यावर पालिकेने नायर रुग्णालय खास कोरोना रुग्णालय जाहीर करत कोरोनाबाधित महिलांच्या प्रसूतीसाठी या रुग्णालयात स्वतंत्र कक्ष सुरू केला आहे.
मुंबईमधील करोनाबाधित गरोदर महिलेला सध्या याच रुग्णालयात पाठवले जात आहे. दिवसभरात 2 ते 3 महिलांची प्रसूती या ठिकाणी होते. प्रसूतीसाठी स्वतंत्र कक्ष निर्माण केला आहे. शस्त्रक्रिया करण्यासाठीही वेगळा कक्ष राखीव ठेवण्यात आला आहे. मुंबईमधील 52 कोरोनाबाधित महिला प्रसूतीसाठी या ठिकाणी भरती झाल्या आहेत. त्यापैकी 25 महिलांची प्रसूती योग्य प्रकारे पार पाडली आहे. नुकतीच एका महिलेची प्रसूती सिझरिंग करून करण्यात आली. यासाठी आवश्यक ती काळजी डॉक्टरांकडून घेण्यात आली होती.
नवजात बालकांना आईपासून कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून जन्मल्यानंतर लगेचच विलगीकरण कक्षामध्ये ठेवले जाते. मास्कचा वापर, दूध पाजण्यापूर्वी हाताची स्वच्छता अशी काळजी घेत बाळाला दर दोन तासांनी दूध पाजण्यासाठी आईकडे दिले जाते. या ठिकाणी अॅडमिट असलेल्या बहुतांश मातांमध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे आढळलेली नाहीत, असे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरम्यान, गरोदर महिलांना कोरोनाची लक्षणे जाणवल्यास त्यांनी रुग्णालायत उपचारासाठी दाखल व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.