मुंबई : राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराचा प्रश्न प्रलंबित असताना आता पुन्हा एकदा मंत्रिमंडळ विस्ताराची नवी तारीख समोर आली आहे. बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचे नेते आणि प्रतोद भरत गोगावले यांनी मंत्रिमंडळ विस्तार आता 1 फेब्रुवारी नंतर होईल असा दावा ईटीव्ही भारतशी बोलताना केला आहे. शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर गेल्या सहा महिन्यांमध्ये मोजक्याच महामंडळ आणि समित्यावर पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. महामंडळवरील सदस्यांच्या नियुक्ती आणि समितांवरील सदस्यांच्या नियुक्ती लवकरच केल्या जातील याबाबत सर्व चर्चा झाली असून, तयारी झाली आहे. केवळ या केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालासाठी काही बाबी थांबल्या होत्या असेही गोगावले यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
निवडणूक आयोगात आमचाच विजय : निवडणूक आयोगात सुरू असलेल्या सत्ता संघर्षात आमच्या बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाचा विजय होईल. कारण बहुतांश पदाधिकारी हे आमच्या पक्षात आहेत. आमदार खासदारांचे आम्हाला पाठबळ आहे. तसेच, सदस्यांच्या कागदपत्रांची पूर्तता ही आम्ही करीत आहोत. त्यामुळे धनुष्यबाण हे चिन्ह आम्हाला नक्की मिळेल असा दावाही भरत गोगावले यांनी केला आहे. जर आमच्या विरोधात आयोगाचा निकाल गेला तरीही परिस्थिती फारशी बदलणार नाही त्याबाबत आमच्या पक्षाचे नेते आणि पदाधिकारी योग्य निर्णय घेतील असेही त्यांनी सांगितले आहे.
मोदींची बदनामी करणारी डॉक्युमेंटरी : बीबीसीच्या वतीने तयार करण्यात आलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डॉक्युमेंटरीवर आता बंदी आणली आहे. ही डॉक्युमेंटरी दाखवणे आणि मोदींची बदनामी करणे चूक आहे हा मोदींची बदनामी करण्याचा कट आहे असा आरोपही गोगावले यांनी केला. पदवीधर मतदार संघाचे नाशिक येथील उमेदवार सत्यजित तांबे यांना भाजपाने पाठिंबा दिल्यामुळे तसेच औरंगाबादचे शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या विरोधात जयदत्त क्षीरसागर गेल्यामुळे आता पाचही विधान परिषदेच्या जागा शिंदे फडणवीस यांच्या युतीला मिळतील अशी शक्यता निर्माण झाली आहे, असेही गोगावले यांनी यावेळी सांगितले आहे.
शिंदे फडणवीसांची मोठी कसरत : शिंदे गटातील नेत्यांसह भाजपमधीलही अनेक जण मंत्रिमंडळ विस्ताराकडे डोळे लावून बसले आहेत. या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळाल्यामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याची चर्चा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार करताना शिंदे फडणवीसांची मोठी कसरत होणार आहे. तसेच, मंत्रिमंडळ विस्तारात संधी न मिळणाऱ्या आमदारांची नाराजी दूर करण्याचे एक मोठे आव्हान त्यांच्यासमोर असणार आहे.
हेही वाचा : राहुल गांधी, बहीण प्रियंका गांधी यांची श्रीनगरमध्ये स्नोबॉल फाईट