मुंबई - भारतीय जनता पक्षाचे खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी वेळ मागितली होती. पण, त्यांना ठाकरेंकडून भेट नाकारण्यात आली. अशा बातम्या प्रसारमाध्यमातून काही दिवसांपासून पसरत आहेत. त्यावर भाजपचे नेते विनोद तावडे यांनी पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले. सोमय्या यांनी कुठल्याही प्रकारची भेट मागितली नाही, त्यामुळे ती नाकारण्याचा प्रश्नच नाही. ईशान्य मुंबईच्या उमेदवारीचा तिढा सोडवला जाईल, असेही त्यांनी सांगतिले.
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या प्रचारात खासदार किरीट सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. त्यामुळे शिवसेनेचे नेते सोमय्यांवर नाराज आहेत. त्यांना ईशान्य मुंबईतून उमेदवारी मिळू नये, यासाठी शिवसेना आग्रही आहे. सोमय्यांना उमेदवारी दिल्यास शिवसेना या मतदारसंघात भाजपला मदत करणार नाही, असेही शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. शिवसेनेचे आमदार सुनिल राऊत यांनी स्वतंत्र निवडणूक लढवण्याचा इशारा दिला आहे.
शिवसैनिकांच्या भूमिकेवर शिवसेनेच्या वरिष्ठ नेतृत्वाने अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरेंसह सर्व वरिष्ठ नेत्यांचा शिवसैनिकांच्या भूमिकेस पाठिंबा असल्याचे दिसत आहे. त्यामुळे भाजपपुढे पेच निर्माण झाला आहे. सोमय्या हे ईशान्य मुंबईतून विद्यमान खासदार आहेत. त्यामुळे सोमय्यांची उमेदवारी भाजपसाठी महत्वाची आहे. पण, शिवसेनेची मनधरणी कशी करावी? असा प्रश्न भाजपसमोर आहे.