मुंबई - शिवसेनेने मागील पाच वर्षात मोदींवर अनेकदा कडवी टीका केली. पण, आता ते सोबत लढत आहेत. त्यामुळे त्यांच्या अशा संधीसाधू राजकारणाला मुंबईची जनता धडा शिकवेल, असे वक्तव्य काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी केले. मुंबईतून काँग्रेसचे खासदार निवडून येतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
शिवसेनेच्या खासदारांनी मोदींचे नाव घेऊन २०१४ च्या निवडणुका जिंकल्या. पण, मागील पाच वर्षांपासून ते त्यांच्या नावाने खडे फोडत आहेत. मोदींवर शिवसेनेने कडवी टीका केली. पण, आता ते निवडणुका लढण्यासाठी एकत्र आले आहेत. त्यामुळे त्यांच्या या संधीसाधू राजकारणाला मुंबईतील जनता उत्तर देईल, असे देवरा म्हणाले. यावेळी त्यांनी शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांच्यावर निशाणा साधला. पाच वर्षात त्यांनी कोणतेही काम केले नसल्याचे ते म्हणाले.
मुंबईतील काँग्रेसचे सर्व उमेदवार अनुभवी आहेत. त्यांना काम करण्याचा अनुभव आहे. लोकांशी त्यांचे संबंध आहेत. त्यामुळे ते आपल्या ताकदीवर आणि पक्षाच्या विचारधारेवर यशस्वी होतील, असे देवरा म्हणाले. मुंबईतील एका जागेवर उमेदवार देणे बाकी आहे. पण, लवकरच त्याची घोषणाही केली जाईल असे त्यांनी सांगितले.
मिलिंद देवरा यांनी नुकतेच मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद हाती घेतले आहे. ते म्हणाले, की मी पक्षात शिस्त आणण्याचा प्रयत्न करेन. सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न करेन. मेहनती कार्यकर्त्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. मात्र, बेशिस्त लोकांना सहन केले जाणार नाही असे देवरा म्हणाले.