मुंबई - मंगळवारी (१२ फेब्रुवारी) रात्री उशिरा मोहिनी व्हिलेज भागाला पाणी पुरवठा करणारी ६० इंच व्यासाची पाईप लाईन फुटून रस्ते जलमय झाले होते. मुंबई महानगर पालिका तलावातील पाणी साठा कमी असल्याने १० टक्के पाणी कपात करते. त्यात भर म्हणून रात्री उशिरा मोठी पाईप लाईन फुटल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झाली.
ही पाईप लाईन फुटल्याने एल. विभागाच्या नागरिकांना २ दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे, असे महानगर पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्या वतीने सांगण्यात आले. साकीनाका भागातील मोहिनी व्हिलेजमध्ये रात्री उशिरा ६० इंच व्यासाची जलवाहिनी अचानक फुटल्याने मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर पाणी वाहू लागले होते. यावेळी रस्त्यावरील वाहन धारकांना प्रवास करताना तारेवरची कसरत करावी लागली.
बृहन्मुंबई महानगर पालिकेतर्फे जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. या जलवाहिनीच्या दुरुस्तीमुळे साकीनाका मोहिनी व्हिलेज (एल) विभागातील पाणीपुरवठा काही भागांना कमी दाबाने किंवा न होण्याचीही शक्यता आहे. जलवाहिनी का फुटली, याचा शोध महापालिका कर्मचारी घेत आहेत.