मुंबई - क्रुज ड्रग्ज पार्टी प्रकरणात बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला अटक झाली होती. यानंतर नवाब मलिक यांनी या प्रकरणातील त्रुटी समोर आणत मुंबई एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर आरोप केल्यानंतर गेल्या अनेक दिवसांपासून समीर वानखडे आणि नवाब मलिक यांचा शाब्दिक वार सुरू आहे. यानंतर आता आर्यन खान प्रकरणासह पाच प्रकरणाचा तपास एनसीबीचे एसआयटी पथक करत आहे.
लीगल एनसीबीची टीम -
आर्यन खान प्रकरणासह नवाब मलिक यांचे जवाई समीर खान यांचादेखील तपास आता दिल्लीतील एसआयटी करणार आहे. मात्र, तपास सुरू करण्यापूर्वी समीर खान यांच्या संदर्भात उच्च न्यायालयात देण्यात आलेला जामीन रद्द करण्याकरिता जामीनासंदर्भात वरिष्ठ न्यायालयात प्रयत्न सुरु झाले आहेत. यासंदर्भात लीगल एनसीबीच्या टीम कडून माहिती घेण्यात येत आहे. मलिक यांचे जावई समीर खान यांना दिलेला जामीन रद्द करण्यासाठी एसआयटी आता कोर्टात जाण्याचा विचार करत असल्याचे माहिती देखील सूत्रांकडून मिळाली आहे.
हेही वाचा - आर्यन खान ड्रग्स प्रकरणात मोहित कंबोज यांचा धक्कादायक खुलासा; Whats App चॅट केले सादर
समीर खानकडे सापडले होते 200 किलोपेक्षा जास्त ड्रग्ज -
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी वानखेडे यांच्यावर वसूलीसह अनेक अरोप केले होते. तर, मलिक यांच्या जावयाविरुद्ध ड्रग्जप्रकरणी कारवाई केल्यामुळेच मलिक आपला राग काढत असल्याचे आरोप वानखेडे कुटुंबीयांकडून करण्यात आले. एनसीबीला २० हजार रुपये किमतीच्या व्यवहाराचे पुरावे सापडल्यानंतर नवाब मलिकांचा जावई समीर खानला एका ड्रग्स प्रकरणात समन्स पाठवण्यात आले होते. त्याला जानेवारीमध्ये अटकही झाली होती. समीर खान यांच्याकडे तब्बल २०० किलोपेक्षा जास्त ड्रग्ज होते, असे तपास यंत्रणांनी सांगितले होते. मात्र, मलिक यांनी हर्बल तंबाखू असल्याचा दावा केला आणि सप्टेंबरमध्ये समीर खान यांचा जामीन मंजूर करण्यात आला. आता एसआयटीकडून या जामीनंसदर्भात वरिष्ठ न्यायालयात जाण्याचा एसआयटीचा विचार आहे.
नवाब मलिक यांचे जावाई समीर खान यांना एनडीपीएस न्यायालयाकडून जामीन मंजूर
कॅबिनेट मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना ड्रग्स प्रकरणी मुंबईतील न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. समीर खान आणि इतर दोन आरोपी, राहिला फर्निचरवाला आणि करण सेजनानी यांच्यवर एनडीपीएस ॲक्टच्या कलम 8 (सी), 20 (बी) (सी), 27 ए, 27, 28 आणि 29 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. विशेष एनडीपीएस न्यायालयानचे न्यायाधीश ए.ए. जोगळेकर यांच्यापुढे समीर खान यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या वस्तूंचा रासायनिक विश्लेषण अहवाल सादर करण्यात आला. ज्यामधले 18 नमुन्यांपैकी 11 नमुन्यांमध्ये गांजा नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे समीर खान यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. यापूर्वी समीर खानचा जामीन अर्ज तपास चालू असल्याच्या कारणावरून फेटाळण्यात आला होता.