मुंबई - आपल्या सुमधुर गायनाने अबालवृद्धांना मंत्रमुग्ध करणारे ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर आता एका नव्या रुपात रसिक श्रोत्यांच्या भेटीला आले आहेत. त्यांचे हे नवे रुप पाहून अनेकजणांना आश्चर्य वाटत आहे. त्यांच्या या नव्या लुकची संगीत विश्वात चर्चा होताना दिसतेय.
वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी चक्क केशरोपण करुन नवीन लूक धारण केला आहे. सध्या संपूर्ण संगीतविश्वात त्यांच्या या नवीन लुकची चर्चा सुरू आहे. एका वाहिनीने सुधीर फडकेंच्या जन्मशताब्दी निमित्त मुंबईत आनंदयात्री या सांगीतिक कार्यक्रमचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मान्यवर गायकांनी अनेक गाण्याचे सादरीकरण केले. यात सुरेश वाडकर यांचाही समावेश होता.
सुरेश वाडकर यांचे केस लवकरच गेले होते. मात्र, एकीकडे गाण्याचं करिअर आणि दुसरीकडे आजीवसन गुरुकुलचा पसारा यामुळे त्यांनी कदाचित आपल्या दिसण्याकडे कायम दुर्लक्ष केले होते. मात्र, 'देर आये पर दुरुस्त आये' या युक्तीनुसार त्यांनी या गोष्टीकडे आता तरी लक्ष दिले आहे. च्यांनी केशरोपन केल्याने त्यांचे व्यक्तिमत्व अधिकच खुलून दिसत आहे. चाहत्यांसह शिष्यांनीही त्यांच्या या नव्या लुकला पसंती दिली आहे.
आजवर सांज धले असो, किंवा ए जिंदगी गले लगा ले असो किंवा ओंकार स्वरूपा, हे भास्करा अशी अनेक अवीट गोडीची गाणी देणाऱ्या वाडकरांचा हा नवीन अवतार नक्कीच कौतुकास्पद आहे. विशेष म्हणजे या वयात कशाला ? किंवा लोक काय म्हणतील असा विचार करत बसण्यापेक्षा त्यांनी हा बदल करून चाहत्यांना एक सरप्राईज दिलयं एवढं मात्र नक्की.