मुंबई - राज्यातील विधानसभेच्या निवडणुका कधी जाहीर होणार याची चर्चा गेले काही दिवस होती. आज या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्यापासून आचारसंहिता लागू झाली. मात्र, आज निवडणुकांच्या तारखा जाहीर होऊन आचारसंहिता लागू होणार असल्याने मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या महापौर आणि सर्वच समितीच्या अध्यक्षांनी महापालिकेत दांडी मारल्याने त्यांच्या दालनाबाहेर शुकशुकाट होता.
मुंबई महानगरपालिकेचे कामकाज सभागृह आणि समित्यांच्या माध्यमातून चालते. पालिकेत ४ वैधानिक तर सहा विशेष समित्या आहेत. या समित्यांच्या अध्यक्षांसाठी पालिकेच्या मुख्यालयात दालने बनविण्यात आली आहेत. आपल्या कामांसाठी मुंबईकर नागरिक या दालनात भेटीगाठीसाठी मोठ्या संख्येने येतात. महाराष्ट्रात निवडणुका कधीही लागू शकतात त्यासाठी १३ सप्टेंबरला आचारसंहिता लागू शकते, अशी शक्यता त्यांना होती म्हणून अनेक अध्यक्षांनी आपल्या समित्यांच्या बैठका १३ सप्टेंबरपर्यंत उरकून घेतल्या होत्या.
हेही वाचा - काँग्रेस आक्रमक : राज्य सरकारने १६ ते २१ सप्टेंबरपर्यंत घेतलेल्या निर्णयांची चौकशी करा
आचारसंहिता लागल्यावर पालिकेचे आर्थिक खर्चाचे प्रस्ताव मंजूर करता येणार नाहीत. म्हणून मागील आठवड्यात २ तर या आठवड्यात सोमवार ते गुरुवार अशा लागोपाठ ४ अशा एकूण स्थायी समितीच्या ६ सभा घेण्यात आल्या आहेत. त्यानंतर पालिकेतील समिती अध्यक्षांनी पालिकेत येणे टाळले आहे. आज सकाळी दिल्ली येथे निवडणूक आयोगाने निवडणुकीच्या तारखा जाहीर केल्या. तेव्हापासून महाराष्ट्रात आचारसंहिता लागू झाली. यामुळे पालिकेतील समितींच्या अध्यक्षांनी पालिकेत येणे टाळले आहे. यामुळे नेहमी गर्दी असलेल्या त्यांच्या दालनाबाहेर आज शुकशुकाट होता.
हेही वाचा - 'लोकशाही महोत्सवाचे स्वागत, सर्वांनी यात सहभागी व्हा'
महापौरही गैरहजर
मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनाही विधानसभेचे वेध लागले आहेत. त्यांना वांद्रे पूर्व येथून निवडणूक लढवायची आहे. आचारसंहिते पूर्वी त्यांनी आपल्या सत्ताधारी शिवसेनेच्या नगरसेवकांनी केलेल्या कामांची मोठ्या प्रमाणात उद्घाटने आणि भूमिपूजन केले आहे. आता आचारसंहिता लागली असल्याने उद्घाटन आणि भूमिपूजन करता येणे शक्य नसल्याने त्यांनीही पालिका मुख्यालयातील आपल्या दालनात येणे टाळले आहे. यामुळे त्यांच्या कार्यालयातही शुकशुकाट होता.