मुंबई - कोरोना विषाणूमुळे जगभारातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. कोरोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना राज्य सरकार आवश्यक त्या उपाय योजना करत आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे सिध्दीविनायक गणपतीचे दर्शन बंद करण्यात आल्याची माहिती मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी दिली आहे.
हेही वाचा - कोरोना कहर : मंत्रालयात आता 'जनता प्रवेशबंदी', कर्मचाऱ्यांची बायोमेट्रिक हजेरी बंद
महाराष्ट्र शासनाने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे सिद्धीविनायक मंदिर समितीने सिद्धीविनायकाचे दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शासनाच्या पुढील सूचना मिळेपर्यंत दर्शन बंद ठेवण्याचा निर्णय न्यास व्यवस्थापन समितीने घेतला आहे. परंतू या कालावधीत न्यासातर्फे देण्यात येणारा वैद्यकीय मदत कक्ष रुग्णांसाठी सुरुच राहणार असल्याचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी सांगितले.