मुंबई : येणाऱ्या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे ( Shri SiddhiVinayak Bappa ) दर्शन घेण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी असते. मुंबईतूनच नाहीत तर राज्यातून, राज्याच्या बाहेरून सुद्धा भाविक नवीन वर्षाला श्री सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात हजेरी लावतात. यासाठी श्री सिद्धिविनायक मंदिर न्यासाकडून विशेष तयारी करण्यात आली आहे. ( Shri SiddhiVinayak Bappa Darshan ) श्री सिद्धिविनायक मंदिर हे समस्त मुंबईकरांसाठी आराध्य दैवत आहे. मुंबईतील कानाकोपऱ्यातील हजारो भाविक दररोज श्री सिद्धिविनायकाच्या दर्शनाला येत असतात. त्या सोबतच नवीन वर्षाची सुरुवात बाप्पाच्या आशीर्वादाने व्हावी ही अनेक भाविकांची इच्छा असते. त्यामुळे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागलेल्या असतात. अशावेळी भाविकांची गर्दी होते.
चोख बंदोबस्त : श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांसाठी गणपती बाप्पाचे दर्शन क्यूआर कोड शिवाय देण्याचा निर्णय घेतला आहे. नववर्षाच्या पहिल्या दिवशी बाप्पाच्या दर्शनासाठी होणारी गर्दी लक्षात घेता हा निर्णय घेण्यात आला आहे. भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे म्हणून दर्शनाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सुरक्षेच्या दृष्टिकोनातूनही चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. ( Bappa Darshan in New Year without QR code ) अलीकडेच सिद्धिविनायकाच्या मूर्तीला शेंदूर लेपन करण्यात आले आहे. यामुळे १४ डिसेंबर ते १८ डिसेंबरपर्यंत मंदिर बंद होते. मात्र, आता १९ डिसेंबरपासून मंदिर भविकांसाठी पुन्हा खुले करण्यात आले आहे.
दर्शन व आरतीच्या वेळेत केलेले बदल : १ जानेवारी साठी दर्शन व आरतीच्या वेळेतही बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार पहाटे ३:१५ ते ५:१५ दरम्यान दर्शन, ५:३० ते ६ वेळेत आरती. सकाळी ६ ते११:५५ पर्यंत दर्शन, १२:०५ ते १२:३० या वेळेत श्रींचा नैवेद्य, १२:३० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत दर्शन. ७ ते ७:१० पर्यंत धुपारती, ७:३० ते ८ वाजेपर्यंत आरती, ८ ते ११:३० पर्यंत दर्शन व त्यानंतर ११:५० वाजता शेजारती होईल. दरम्यान रात्री ११:३० वाजता मंगळवार प्रमाणे दोन्ही चेकपोस्ट चे दरवाजे बंद होतील. असे मंदिर न्यासाने जाहीर केले आहे. त्यासोबतच नववर्षाच्या पहिल्या दिवशी भाविकांची गर्दी वाढण्याची लक्षात घेऊन रांगेची विशेष व्यवस्था केली गेली असून भाविकांनी सहकार्य करावे, असे आव्हान श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर न्यासाने केले आहे. ( Shri SiddhiVinayak Bappa Darshan in New Year )