मुंबई : श्रद्धा हत्येसंदर्भात ( Shraddha murder ) रोज नवनवीन माहिती पुढे येत आहे. आता तिच्या मित्राने तिला मदत केल्याचे सांगितले आहे. राहुल राय याने पोलिसांना सांगितले की, त्यानेच श्रद्धाला आफताब विरोधात तक्रार दाखल करण्यास मदत केली होती. त्याने एएनआयशी बोलताना हेही सांगितले की, 2020 मध्ये आफताबने तिला मारहाण केल्याचे सांगितल्यावर त्याने आणि त्याच्या मित्रांनी तिला एफआयआर दाखल करण्यास मदत केली होती.
आफताब श्रद्धाला करायचा मारहाण - राहुलने दावा केला की, तिने तक्रार दाखल केल्यानंतर दुसऱ्या दिवशी पोलिसांनी तिला पोलिस ठाण्यात बोलावले. आफताबला ताब्यात घेण्याचे सुचवले होते पण तिने नकार दिला. कारण तिला भीती वाटत होती की, आफताब तिला मारेल. कारण त्याने यापूर्वीही तिला मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि तिला अनेकदा मारहाण केली असल्याचे, राहुल रायने सांगितले.
तेव्हापासून आमचा कोणताही संपर्क नाही - राहुलने सांगितले की, "आफताब तिला घरात बंद करून इतर मुलींशी बोलायचा," आणि श्रद्धाने त्याच्यासोबत तिच्या जोडीदाराच्या अमली पदार्थांच्या सेवनाबद्दलही बोलले होते. राहुल पुढे म्हणाला की, "आम्ही जेव्हा पुन्हा तिच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा ती म्हणाली, 'काळजी करू नका, अशा गोष्टी घडतात'. तेव्हापासून आमचा श्रद्धासोबत कोणताही संपर्क झाला नाही. राहुल म्हणाला की त्याने कधीही कल्पना केली नव्हती की तिचे लिव्ह-इन रिलेशनमधील आफताबशी असलेले नातेसंबंध अशा भयंकर परिणामाला सामोरे जातील. श्रध्दा खून प्रकरणाच्या चौकशीचा एक भाग म्हणून दिल्ली पोलिसांचे एक पथक मुंबईत पोहोचले त्याच दिवशी राहुलचे स्टेटमेंट आले आहे.
दिल्ली पोलिसांचा कसून तपास सुरू - दरम्यान, दिल्ली पोलिसांनी शुक्रवारी या हत्या प्रकरणाच्या सुरू असलेल्या तपासाचा आढावा घेण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेतली. पोलिस सहआयुक्त मीनू चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला दक्षिण दिल्लीतील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. पोलिस या वर्षी जूनमध्ये पूर्व दिल्ली परिसरात सापडलेल्या एका मृतदेहाच्या प्रकरणाचा देखील शोध घेत आहेत आणि मुंबईतील महिलेच्या शरीराच्या जप्त केलेल्या अवयवांशी डीएनए जुळवण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.
मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची कबुली - फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरी (एफएसएल) च्या अधिकार्यांना पूर्व दिल्ली परिसरात सापडलेल्या शरीराच्या अवयवांचे डीएनए जतन करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत, असेही पोलिसांनी सांगितले. दिल्ली पोलिसांच्या एका वेगळ्या पथकाने शुक्रवारी आरोपी आफताबच्या प्रेयसीच्या मृतदेहाचे उरलेले तुकडे आणि तिच्या हत्येसाठी वापरलेले हत्यार शोधण्यासाठी गुरुग्राम येथील पूर्वीच्या कामाच्या ठिकाणी भेट दिली. आफताबने आपल्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या आणि छतरपूरच्या जंगलात टाकण्यापूर्वी तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे केल्याची कबुली दिली. सूत्रांनी सांगितले की, जेव्हा त्याने गुन्हा केला तेव्हा गांजा जास्त सेवन केला होता.