मुंबई- राज्यात कोरोना आणि त्याचे महाभयंकर संकट सुरू असतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे मागील काही दिवसांमध्ये विरोधी पक्षाची भूमिका बजावताना दिसत आहेत. राज्यपाल हे पद संविधानिक दर्जाचे आणि सन्मानाचे असल्याने त्या स्थानी असताना सत्ताधारी पक्षाला आरोप करता येत नव्हता. मात्र, त्यासाठीचा संयम सुटल्याने आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व आमदार भाई जगताप यांनी ट्विटमधून महाराष्ट्र राजभवनाला सध्या आरएसएस शाखा किंवा भाजप कार्यालय म्हणून तात्पुरते नामकरण करावे का? असा प्रश्न करत राज्यपालांच्या राजकीय घडामोडींवर निशाणा साधला आहे.
मुंबई आणि महाराष्ट्राला बदनाम करणारी सिने अभिनेत्री कंगना रणौत हिला राज्यपालांनी राजभवनावर स्वतंत्र वेळ देऊन तिला भेट दिली होती. या भेटीमुळे राज्यात मोठ्या प्रमाणात राजकारण ढवळून निघाले होते. राज्यातील असंख्य प्रश्न उभे असताना राज्यपाल अशा प्रकारे एखाद्या वादग्रस्त अभिनेत्रीला आणि विशेषत: मुंबई महाराष्ट्राची बदनामी केली असताना तिला वेळ कसा देऊ शकतात, अशा प्रकारची टीका राज्यभर सुरू झाली होती. त्यातच आज राज्यपालांकडून पुन्हा राज्यातील महाविकास आघाडीला डिवचण्याचा प्रकार करण्यात आला.
आघाडीतील नेत्याचे चुकीचे कार्टून काढले म्हणून एका निवृत्त मर्चंट नेव्हीच्या अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या शिवसैनिकांवर राज्य सरकार पुन्हा कारवाई करत असतानाच राज्यपालांनी राजभवनावर या अधिकाऱ्याला बोलवून त्याचे म्हणणे ऐकून घेतले. राजभवन येथे त्यासाठी खास वेळ देण्यात आल्याने राज्यपालांच्या विरोधातला संताप दिवसेंदिवस वाढत चालला आहे. यामुळेच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भाई जगताप यांनी आज ट्विट करून आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. राज्यात महाविकास आघाडीकडून राज्यपाल नियुक्त सदस्यांची नियुक्ती व्हावी म्हणून मागील दोन महिन्यापासून राज्यपालांकडे प्रस्ताव पडून आहे. त्यावर आतापर्यंत राज्यपालांनी कोणताही निर्णय जाहीर न करता सरकारची अडवणूक केली.
तसेच, राज्यातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन सरकारने अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, त्यासाठीही राज्यपालांनी आडकाठी आणली होती. यामुळे महाविकास आघाडीतील सर्वच पक्ष राज्यपालांवर नाराज असले, तरी त्याविषयी उघडपणे आपले मत नोंदवू शकत नव्हते. त्यातच आता राज्यपाल भाजपकडून प्रायोजित करण्यात येत असलेल्या कार्यक्रमाला दिवसेंदिवस अधिकच साथ देत असल्याने याविषयी आमदार भाई जगताप यांचे आजचे हे ट्विट राज्यपालांच्या विरोधातील अत्यंत बोलकी प्रतिक्रिया असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
हेही वाचा-जम्बो कोविड रुग्णालय उभारणे पराक्रम नाही, तज्ज्ञ डॉक्टरांचीही असते आवश्यकता - गणेश नाईक