मुंबई - चेहरे झाकलेल्या अज्ञात टोळीने जेएनयूमध्ये हिंसाचार केला आहे. विद्यापीठातील भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि जेएनयू विद्यार्थी संघटनेमधील वाद विकोपाला गेल्याचे हे चित्र आहे. मात्र, देशात अराजकता निर्माण करणारे हे राजकारण धोकादायक आहे. अशाने देशाचे तुकडे पडतील. समाजाला तडे जातील. विद्यापीठे, महाविद्यालये रक्ताने भिजवायची, विद्यार्थ्यांना मारहाण करायची आणि त्यामधून पेटलेल्या होळीवर सत्तेची पोळी शेकायची. इतके निघृण राजकारण कोणी कधीही केले नव्हते. मात्र, आता मोदी-शाहंना जे हवे आहे तेच घडताना दिसत आहे, अशी जोरदार टीका शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.
26/11 च्या मुंबई हल्ल्यामध्येही अतिरेकी 'असे'च तोंड झाकून आले होते -
चेहरे झाकून टोळके आत धुसले. त्यांनी विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात हल्ला केला. त्यामध्ये शंभरच्या आसपास विद्यार्थी आणि शिक्षक जखमी झाले आहेत. तोंडावर बुरखा घालून काळोखात हल्ले करणे ही मर्दानगी नाही. त्यामुळे अशा प्रवृत्तीचे बुरखे उतरवण्याची गरज आहे. मुंबईतील 26/11 च्या हल्ल्यावेळी अतिरेकी असेच तोंड झाकून आले. आता जेएनयूमध्ये तेच चित्र पाहायला मिळाले. कायदा आणि सुव्यस्थेचे धिंडवडे काढणारी ही घटना आहे, असेही सामना अग्रलेखातून म्हटले आहे.
नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून 'भाजप विरुद्ध बाकी सर्व' -
गृहमंत्री अमित शाह नागरिकत्व सुधारणा कायद्याचा प्रचार करण्यासाठी घरोघरी पत्रके वाटण्याच्या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. 'घर घर जागरुकता अभियाना'त स्वतः गृहमंत्री घरोघर पत्रके वाटत आहेत. गृहमंत्र्यावर ही काय वेळ आली आहे? असा सवाल देखील सामना अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत गोंधळ उडाला आहे. त्यामुळे देशभरात अस्थिरतेचा उद्रेक झाला आहे. या कायद्यामुळे हिंदू-मुस्लीम दोन्ही चिडले. त्यामुळे 'भाजप विरुद्ध बाकी सर्व', अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याच सूडभावनेतून अनेक उपद्व्याप केले जात आहेत. जेएनयूमधील राडा हा त्याचाच एक भाग आहे काय? अशी शंका देखील या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आली आहे.
गेल्या ५ वर्षात विद्यापीठात राजकारण, हिंसाचार कोणी घुसवला -
विद्यापीठामध्ये केवळ विद्यार्जनाचे काम व्हावे, असे भाजप सांगते. मात्र, गेल्या ५ वर्षामध्ये विद्यापीठाक राजकारण आणि हिंसाचार कोणी घुसवला? जे आपल्या विचाराचे नाहीत त्यांना उखडून टाकायचे आणि त्यासाठी सत्तेचा मस्तवाल वापर करायचा हे धोरण कोण राबवत आहे? नागरिकत्व सुधारणा कायद्यास विरोध करणारे विद्यार्थी देशद्रोही आहेत, असे सांगणे हाच मुळी देशद्रोह आहे, असा घणाघात देखील केंद्र सरकारवर करण्यात आला आहे.
गांधी बहिण-भावावर स्तुतीसुमने -
गृहमंत्री अमित शाह यांचा असा आरोप आहे की, काँग्रेसचे नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून लोकांची दिशाभूल करत हिंसाचार भडकवला. गृहमंत्र्यांनी हा आरोप पुराव्यासह केला असेल, तर त्या पुराव्याच्या आधारे दंगल भडकविणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवा. दंगलखोरांना अटक करायला तुम्हाला कोणी थांबवले आहे? मात्र, शाह राहुल आणि प्रियांका गांधींवर आरोप करतात त्यावेळी गांधी बहिण-भावामध्ये जनमत तयार करण्याची आणि लोकांना रस्त्यावर उतरवण्याची ताकद असल्याचे शाह मान्य करतात, असे म्हणत अमित शाहंवर तोफ डागली, तर गांधी बहिण-भावावर स्तुती सुमने उधळली आहेत.