मुंबई - राज्यात सत्तास्थापनेचा तिढा अद्याप सुटलेला नाही. पण, शिवसेनेने राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. केंद्रीय मंत्री अरविंद सावंत यांनी राजीनामा देणार असल्याबाबत ट्वीट केले आहे. त्यामुळे, केंद्रात मंत्रीपदाची आस लावून बसलेल्या अनेक शिवसेना नेत्यांचे स्वप्न मात्र भंगल्याचे बोलले जात आहे.
विधानसभा निवडणुकीत मतदारांनी कोणत्याच पक्षाला सरकार स्थापण्यासाठी स्पष्ट बहुमत दिले नाही. यामुळे राज्यात गेल्या १६ दिवसात सरकार स्थापन झालेले नाही. भाजपाकडे १०५ आमदार आहेत. पण, बहुमताचा आकडा त्यांना गाठता येणे शक्य नाही. यासाठी त्यांना शिवसेनेची साथ घ्यावी लागणार आहे. भाजपा आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष मुख्यमंत्री पदावर अडून बसले आहेत. त्यामुळे युतीची सत्ता स्थापन होणे जवळपास अशक्य झाले आहे.
भाजपने सत्ता स्थापन्याबाबत असमर्थता दर्शविल्यानंतर, राज्यपालांनी शिवसेनेला पाचारण केले आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पाठिंब्याशिवाय शिवसेनेला सत्ता स्थापन करणे अशक्य आहे. यासाठी त्यांना भाजपची साथ सोडावी लागणार आहे. याचेच पुढचे पाऊल म्हणून अरविंद सावंत यांना केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास सांगण्यात आले आहे.
येथून पुढे शिवसेनेचे खासदार लोकसभेत विरोधी बाकावर बसलेले दिसतील. त्यामुळे, जे खासदार मंत्रीपदासाठी उत्सुक होते त्यांच्या स्वप्नांवर विरजन पडले आहे. पण, कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है या न्यायाने शिवसेना नेत्यांना ही तडजोड करावी लागणार आहे.