मुंबई - शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना व शिवसेनेला कोणी विसरू शकत नाही, कारण त्यांचे योगदान मोठे आहे. यात सर्वांचे योगदान आहे. पण, बाबरी मशिदीवरचा घुमट काढण्यात शिवसैनिकांचे योगदान मोठे आहे. या कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार आहेत. आम्ही अयोध्येत, राम जन्मभूमीत थाटामाटात कार्यक्रम करणार आहोत. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर शिवसेनेच्यावतीने तिथे कार्यक्रम करणार असल्याची माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली.
राम मंदिराचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले, ही आनंदाची गोष्ट आहे. हा शासकीय कार्यक्रम आहे.आजचा मुहूर्त महत्त्वाचा असून साधुसंतांनी सांगितल्याप्रमाणे आजच्या मुहूर्तावर भूमिपूजन झाले. आजच्या कार्यक्रमाच श्रेय कोणी घेऊ नये, कारण हा शासकीय कार्यक्रम आहे, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी राममंदिर भूमी पूजनाच्या कार्यक्रमावर दिली.
आजच्या कार्यक्रमाला भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी वयोमानामुळे उपस्थित राहू शकले नाहीत, असेही राऊत म्हणाले.
सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचे घाणेरडे राजकारण सुरू आहे. त्याद्वारे महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई पोलीस दलाचे खच्चीकरण करू नये, महाराष्ट्राशी बेईमान करणारे नेते निपजले हे भयंकर आहे. हे प्रकरण सीबीआयकडे द्यावे, हे बिहार सरकार कोण ठरवणारे? त्यांनी त्यांच्या राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था आधी पाहावा, अशी टीका राऊत यांनी केली.