मुंबई - केंद्र सरकारने मंजूर केलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात पंजाब, हरियाणाच्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकार विरोधात आंदोलन सुरू केले आहे. गेल्या दीड महिन्यांपासून दिल्लीच्या सीमेवर हे शेतकरी आंदोलन करत आहे. मात्र, सरकारकडून केवळ चर्चेच्या फेऱ्या घेतल्या जात आहेत. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्रातील भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे.
सरकारला ऑलिम्पिकचे रेकॉर्ड करायचे आहे का?
शेतकऱ्यांनी कृषी कायदा मागे घेण्याची मागणी केली आहे. ते त्या मागणीवर ठाम आहेत. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही हा कायदा लागू करण्यास स्थगिती दिली आहे. तसेच केंद्र सरकारला देखील माहिती आहे, की शेतकरी मागे हटायला तयार नाहीत, मग मोदी सरकारकडून वारंवार चर्चा का केल्या जात आहेत. त्यांना काय चर्चेच्या बैठकीचे ऑलिम्पिक रेकॉर्ड बनवायचा आहे का? असा खोचक टोला संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
हा त्यांचा व्यतिगात विषय आहे,
मीडियाने संयमाने वागले पाहिजे
राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील बलात्काराची तक्रार रेणू शर्मा यांनी मागे घेतली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांना दिलासा मिळाला आहे. या प्रकरणी संजय राऊत यांची प्रतिक्रिया घेतली असता; हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे. त्यामुळे माध्यमांनी संयमाने वागले पाहजे असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
भाजप आज गप्प का?
रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि 'बार्क'चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील संवाद उघडकीस आल्यानंतर देशात खळबळ उडाली आहे. एवढे मोठे प्रकरण उघडीस येऊन सुद्धा केंद्रातील भाजप सरकार गप्प का असा सवाल शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी केला आहे. केंद्रात जर आज काँग्रेसचं किंवा अन्य पक्षाचं सरकार असतं आणि भाजपा विरोधात असती आणि त्यांनी यावरून संसद चालू दिली नसती, अशी प्रतिक्रिया देत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला.
सीरमच्या वादात मीडियाने पडू नये-
सीरम इन्स्टिट्युटला लागलेल्या आगीच्या घटनेनंतर घातपाताची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, या आगीसंदर्भात कोण काय म्हणतंय, इथे आग लावली की लागली, या वादात मीडियाने पडू नये, हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. संपूर्ण देशाचं आणि जगाचे लक्ष त्या संस्थेकडे आहे. अख्ख्या जगाला कोरोनाची प्रतिबंधक लस पुरविण्याचे काम हे सीरम मधून केले जात आहे. आपल्या देशाचा गौरव असलेली ही संस्था असल्याचेही ते म्हणाले.