मुंबई - शेतकऱ्यांविरोधात केंद्र सरकारने कायदे केल्याने देशभरात शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. पंजाबमधील शेतकरी आंदोलन करत दिल्लीत पोहोचले आहेत. यावर कॅनडाचे पंतप्रधान जस्टीन त्रुडो यांनी हा प्रश्न लवकरात लवकर सोडवावा, असे म्हटले आहे. त्यावर आमच्या अंतर्गत प्रश्नात लक्ष घालून आपले राजकीय मनसुबे पूर्ण करू नका, या शब्दांत शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी जस्टीन यांना सुनावले आहे.

काय म्हणाल्या प्रियंका चतुर्वेदी?
जस्टीन यांनी दिल्लीच्या शेतकऱ्यांबाबत सहानुभूती व्यक्त करत, लवकर हा प्रश्न सोडवावा असे म्हटले होते. त्यावर चतुर्वेदी यांनी तुम्ही आमच्या अंतर्गत बाबतीत लक्ष घालून तुमचे राजकीय मनसुबे पूर्ण नका, असे म्हणत सुनावले. तर पंतप्रधान मोदी यांनी त्वरित शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, असेही त्या म्हणाल्या आहेत.
हेही वाचा - उर्मिला मातोंडकर शिवसेना पक्षप्रवेश : "मी जन्माने आणि कर्माने हिंदू"
शेतकऱ्यांचे आंदोलन -
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाचा आज सहावा दिवस आहे. केंद्र सरकारने अखेर कृषी संघटनांशी चर्चा करण्याची तयारी दाखवली आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शेतकऱ्यांशी चर्चा करण्यासाठी काही अटी घातल्या होत्या. ज्या फेटाळत शेतकरी संघटनांनी आपले आंदोलन सुरुच ठेवले होते.