मुंबई ShivSena MLA Disqualification : शिवसेना आमदार अपात्रतेची सुनावणी आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यापुढे पार पडली. शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी आज पुन्हा एकदा उद्धव ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी घेतली. आजच्या उलट तपासणीमध्ये 21 जूनचा ठराव कधीच तयार केला नव्हता, असा दावा शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. याच मुद्द्यावर सुनील प्रभू यांच्यावर प्रश्नांचा भडीमार करण्यात आला. याप्रसंगी सुनील प्रभू यांनी मला आठवत नाही, असं उत्तरं दिलं.
21 जूनचा ठराव तयार नव्हता : आज सुनावणीला सुरुवात झाल्याबरोबर शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी 21 जून 2022 च्या ठरावावर बोलताना या ठरावाची मूळ प्रत विधानसभा अध्यक्षांकडं कोणी, कधी सादर केली? असा प्रश्न सुनील प्रभू यांना विचारला. यावर बोलताना सुनील प्रभू यांनी त्याच वेळी 'ती' प्रत अध्यक्षांकडं दिल्याचं सांगितलं. यावर महेश जेठमलानी यांनी मुळात 21 जूनचा ठराव कधी तयारच करण्यात आला नव्हता असा दावा केला. त्याच बरोबर त्या ठरावाची मूळ प्रत विधानसभा अध्यक्षांकडं नसल्याचं सांगितलं.
प्रश्नांचा सातत्यानं भडीमार : या ठरावाच्या मुद्द्यावर महेश जेठमलानी यांनी सुनील प्रभू यांच्यावर अनेक प्रश्नांचा सातत्यानं भडीमार केला. त्याला सुनील प्रभू यांनी काही प्रश्नांना हे खरे आहे, हे खरे नाही, मला माहित नाही, अशा पद्धतीची उत्तरे दिली. तसंच याप्रसंगी जोरदार युक्तिवाद करत महेश जेठमलानी यांनी 31 ऑक्टोबर 2019 रोजीचा ठराव उद्धव ठाकरे यांनी पाठवला नसून तो शिवसेना विधिमंडळ कार्यालयानं पाठवला असल्याचं सांगितलं. तसंच साक्षीदारानं विचारलेल्या प्रश्नाची नीट उत्तर द्यावी, अशी तंबीही दिली.
आमच्या सुनावणीची तयारी करण्यासाठी : आजची सुनावणी सुरू असताना 'ती' ऐकण्यासाठी शिंदे गटाचे नेते, आमदार, भरत गोगावले आवर्जून उपस्थित होते. यावर बोलताना त्यांनी म्हटलं की, सुनील प्रभू यांची मागील अनेक दिवसांपासून उलट तपासणी सुरू आहे. त्यानंतर आम्हाला सुद्धा सुनावणीला बोलावले जाईल. त्या कारणासाठी आजची सुनावणी ऐकून त्या पद्धतीनं तयारी करण्यासाठी आम्ही आलो आहोत. तसंच विरोधकांची बाजू विरोधक मांडतील. नंतर आमच्या वकिलांनी आमची बाजू मांडल्यानंतर विधानसभा अध्यक्ष त्यांचा योग्य तो निर्णय घेतील, असंही गोगावले म्हणाले. आता पुढील सुनावणी बुधवारी 29 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता सुरू होईल.
हेही वाचा -