मुंबई - मुख्यमंत्रीपदी असतानाही देवेंद्र फडणवीस ही धमकी देतच होते. सर्वांच्या कुंडल्या माझ्या हातात आहेत, असे वक्तव्य फडणवीस करत होते. मग, हे वक्तव्य कशाचे द्योतक आहे? असा सवाल शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
महाविकास आघाडी सरकाच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत विधानसभेचे विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी सरकारवर कडाडून टीका केली. सरकारविरोधात आलेले दोन निर्णय हे सरकारच्या कामाची पावती असल्याचे फडणवीस म्हणाले होते. तसेच राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करत येईल, अशी स्थिती असल्याचे ते म्हणाले होते. शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीस यांच्या टीकेला उत्तर दिले आहे.
विरोधकांनी टीका करावी; मात्र...
फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत पहिली हे बरे झाले. मुख्यमंत्र्यांवर टीका करणे हे विरोधकांचे काम आहे. मात्र, राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी स्थिती नाही. मराठी उद्योजकाच्या आत्महत्येसंदर्भात संबंधित व्यक्तीविरोधात पुरावे असताना पोलिसांनी कारवाई केली. बेकायदेशीर बांधकाम पाडले गेले. त्यावर न्यायालयाने निर्देश दिले आहेत. याला न्यायालयात उत्तर दिले जाईल. कुणी महाराष्ट्राच्या अस्मितेवर बोलत आहे, मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणत आहे, याला उत्तर दिल्यावर राष्ट्रपती राजवट लागू करायची काय? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. तसेच न्यायालयाच्या एखाद्या निर्णयावर राष्ट्रपती राजवट लागू करावी, अशी येथील स्थिती नाही. इथे अधिकारांचा गैरवापर करण्यात आलेला नाही. उलट केंद्रीय स्तरावरील संस्था दडपशाही करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला. तर त्याला मुख्यमंत्री उत्तर देणार असल्याचे राऊत म्हणाले. विरोधकानी टीका करावी. मात्र, त्यासाठी खोट्याचा आधार न घेता टीका करावी, असेही राऊत म्हणाले.
हेही वाचा - ईडी व सीबीआय विरोधात संजय राऊतांचे वादग्रस्त ट्विट; दिली श्वानांची उपमा
भाजपाची टीका -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे पुण्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाला जाणार नसल्याने भाजपाचे नेते टीका करत आहेत. मात्र, त्यापूर्वी भाजप कार्यकर्ते आणि नेत्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या सूचना पाहाव्यात. पंतप्रधान कार्यालयाच्या सूचनेवरूनच मुख्यमंत्री पुण्यात गेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.