मुंबई - चीनच्या मुद्द्यावर कोणत्याही चर्चेला घाबरत नाही, आपण १९६२ पासून भारत-चीन संबंधावर संसदेत बोलायला तयार असल्याचे गृहमंत्री शाहांनी जाहीर केले. मात्र, १९६२च्या भूतकाळात जायची गरज काय? असा सवाल सामनातून विचारण्यात आलाय. पंडित नेहरुंनी १९६२ साली चुका केल्या असतील मात्र, तुम्ही १९६२ सालात का रांगताय, २०२० उजाडलयं आणि जग बरचं पुढे गेलंय. त्यामुळे भूतकाळ विसरून चीनचा आपल्याला वर्तमानात सामना करायचा आहे. पंतप्रधान नेहरू असतील किंवा मोदी, चीनचे शेपूट वाकडे होते आणि ते वाकडेच राहतील, असे आजच्या सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
चीन आणि भारतादरम्यान सुरू असलेल्या तणावावरून केंद्र सरकारच्या भूमिकेवर सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. सीमेवरील गलवान खोऱ्यात चीनची घुसखोरी, बेकायदा बांधकामे सुरूच आहेत, त्यांना सडेतोड उत्तर देण्याऐवजी सरकार सोनिया गांधी, राहूल गांधी व काँग्रेस पक्षालाच सडेतोड उत्तरे देत आहे. देशाला भाजप विरूद्ध काँग्रेस असे युद्ध पहायला मिळत आहे. मात्र, आपल्याला कोरोनाशी लढायचे आहे, सरकारच्या विरोधकांशी नाही, अशी ट्यून दिल्लीत वाजवण्याची गरज असल्याचे सामनात म्हणले आहे.
चीन व काँग्रेसची नाती विचारण्याऐवजी पंतप्रधान केअर्स फंडला चिनी कंपन्यांकडून शेकडो कोटी रुपये आले आहेत. त्याचाही विचार व्हावा, तसेच परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्या मुलाच्या खात्यात चिनी कंपन्यांकडून पैसे जमा झाल्याचा आरोप काँग्रेसने केला, त्याबद्दलही बोलले जावे. मात्र, देशात फक्त भाजप विरूद्ध काँग्रेसचे युद्ध सुरू आहे आणि मुळ मुद्दा भरकटत आहे, असे सामनात म्हटले गेले.
या संपूर्ण वादात शरद पवारांनी 'देशाच्या सुरक्षेबाबतच्या विषयात कोणी राजकारण करू नये,' असे वक्तव्य केले. त्यांनी हे विधान काँग्रेस किंवा राहूल यांना टोला लगावण्यासाठी केल्याच्या चुकीच्या बातम्या भाजपकडून पसरवल्या जात आहेत, त्यावरही टीका केली. मुळात देशाच्या सुरक्षेच्या विषयाबाबत राजकारण व्हायलाय नको. मात्र, राहूल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीबद्दल विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावी. कारण जर चीनने घुसखोरी केलीच नसेल, तर आपले २० जवान हुतात्मा झालेच कसे, हा प्रश्न अनुत्तरीत राहतो. दरम्यान, भारताकडे वाईट नजरेने पाहणाऱ्यांना सडेतोड आणि ठोस उत्तर मिळाले, असे वक्तव्य पंतप्रधान मोदींनी केले, त्यांनी नाव न घेता राहूल गांधींच्या शंकेचे निरसन केले. सोबतच पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली भारत कोरोना आणि चीनविरुद्धच्या लढाया जिंकेल, असे विधान अमित शाहांनी केले. त्यामुळे केंद्र सरकारने या दोन्हीवर लक्ष केंद्रित करावे, विरोधकांच्या आदळआपटीवर नाही, असा खोचक सल्ला सामनातून देण्यात आला आहे.