मुंबई - कुटुंबामध्ये वाद झाल्यावर लग्न झालेल्या महिलांना घराबाहेर काढले जाते. त्यांना घर नसल्याने त्यांच्यावर रस्त्यावर येण्याची वेळ येते. यामुळे या महिलांना हक्काने आपल्या घरात राहाता यावे म्हणून घराची नोंदणी करताना पुरुषाबरोबर महिलांचे नाव नोंद करणाऱ्या घरांना करामधून सूट द्यावी, अशी मागणी शिवसेनेच्या नगरसेविका व विधी समितीच्या अध्यक्षा शितल म्हात्रे यांनी केली आहे.
कुटुंबामध्ये अनेक वेळा वाद होतात. नवरा-बायको, सासू-सुनेची भांडणे होतात. कधी कधी तर वाद विकोपाला जाऊन घरात लग्न करून आलेल्या महिलांना घराबाहेर काढले जाते. लग्न झालेल्या महिलेला घराबाहेर काढल्याने अनेकवेळा त्यांनी राहायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो. अशावेळी महिलांना त्यांचे हक्काचे घर नसते. यामुळे घर घेताना किंवा घराच्या मालकी हक्काची नोंद करताना पुरुषाबरोबर महिलांची नावे नोंद करावी. तसेच महिलांची नावे नोंद करणाऱ्या घरांना पालिकेने मालमत्ता कर तसेच इतर करांमध्ये सूट द्यावी, अशी मागणी शीतल म्हात्रे यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे पालिकेकडे केली आहे. असे केल्याने महिलांना आपले हक्काचे घर मिळेल. कुटुंबात काही वाद झाल्यास त्यांना घराबाहेर कोणी काढणार नाही, असे म्हात्रे यांनी म्हटले आहे. महापालिका ओला आणि सुका कचरा वर्गीकरण करणाऱ्यांना, कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या, रेन वॉटर हार्वेस्टिंग करणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना मालमत्ता करामध्ये सूट देते त्याच प्रमाणे महिलांची नावे घरामध्ये नोंद करणाऱ्या घरांना करामध्ये सूट द्यावी, अशी मागणी म्हात्रे यांनी केली आहे