मुंबई - दादरमधील सुप्रसिद्ध अशा शिवाजी पार्क मैदानाचा नामविस्तार "छत्रपती शिवाजी महाराज पार्क "असा करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी महापालिका सभागृहात मांडला होता. त्या प्रस्तावाला मंजुरीही मिळाली होती. महापालिकेने "छत्रपती शिवाजी महाराज पार्क" मैदानाबाहेर अशा पाट्या लावल्या आहेत. यामुळे आता हे मैदान "छत्रपती शिवाजी महाराज पार्क" मैदान म्हणून ओळखले जाणार आहे. तब्बल ७३ वर्षांनी शिवाजी पार्क मैदानाचं नाव बदलण्यात आले आहे.
माहीम पार्कचे शिवाजी पार्क -
या मैदानाचे नाव "माहीम पार्क" असे होते. १० मे १९२७ रोजी या मैदानाचे "शिवाजी पार्क" असे नामकरण करण्यात आले होते. या मैदानात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा १९६६ मध्ये लोकवर्गणीतून उभारण्यात आला आहे. या मैदानामधून अनेक क्रिकेट खेळाडू तयार झाले आहेत. तसेच या मैदानावर अनेक राजकीय पक्षांच्या सभा संमेलन होत असतात. यामुळे या मैदानाला वेगळी अशी ओळख आहे. याच मैदानावर मुंबई महापालिकेत आणि राज्यात सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचे दसरा मेळावे संपन्न झाले आहेत.
हेही वाचा - लेफ्टनंट जनरल हरिंदर सिंग आयएमएचे नवे कमांडंट
शिवाजी महाराजांचा अवमान -
माहीम पार्क म्हणून ओळख असलेल्या मैदानाचे १९२७ मध्ये शिवाजी पार्क असे नामकरण करण्यात आले. तेव्हापासून या मैदानाचा उल्लेख शिवाजी पार्क असा होऊ लागला. शिवाजी महाराजांना छत्रपती हा किताब देण्यात आल्याने छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख केला जात होता. मात्र फक्त शिवाजी पार्क म्हटल्याने शिवाजी महाराजांचा अवमान होत असल्याचा मुद्दा अनेक संघटनांनी समोर आणला होता.
यांनी मांडला प्रस्ताव -
शिवाजी पार्क असा नामउल्लेख केल्याने शिवाजी महाराजांचा अवमान होत असल्याने या उद्यानाचा नामविस्तार "छत्रपती शिवाजी महाराज पार्क" असा करण्याचा प्रस्ताव स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी मार्च महिन्यात पालिका सभागृहात मांडला होता. त्याला सर्वपक्षीय नगरसेवकांनी पाठिंबा दिला होता. नामविस्तराचा प्रस्ताव एकमताने मंजूर झाल्याची घोषणा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केली होती.
कोरोनामुळे थांबली होती कार्यवाही
मार्च महिन्यात मंजूर झालेल्या प्रस्तावाला पालिका आयुक्तांनीही मंजुरी दिली. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याने पुढील कार्यवाही थांबली होती. कोरोनाचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आल्यावर पालिका प्रशासनाने या मैदानाच्या नामविस्ताराची पाटी मैदानाबाहेर लावली आहे. यामुळे आता हे मैदान "छत्रपती शिवाजी महाराज पार्क" या नावाने ओळखले जाणार आहे.
हेही वाचा - शांतीवनच्या पुढाकारातून बीडमध्ये इस्राईल तंत्रज्ञान वापरून शेतीचे नवे प्रयोग; कमी पाण्यावर फळझाडांची लागवड