मुंबई Shivaji Maharaj Statue : भारत पाकिस्तान सीमेजवळील कुपवाडा इथं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचं अनावरण आज पार पडत आहे. ही देशासाठी अभिमानाची बाब असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. या सोहळ्यात सहभागी होण्याची संधी मला मिळत असल्यानं ही आपल्यासाठी मोठी गोष्ट असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.
कुपवाडा सीमेजवळ छत्रपती शिवरायांचा पुतळा : भारत पाकिस्तान सीमेजवळ असलेल्या कुपवाडा इथं छत्रपती शिवराय यांचा भव्य अश्वारुढ पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचं आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत अनावरण होणार आहे. कुपवाडा सीमेवर छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारल्यानं देशभरात उत्साहाचं वातावरण आहे.
काय आहे शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची खासियत : कुपवाडा इथल्या भारतीय सैन्य दलाच्या छावणीत उभारण्यात येणारा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा साडे दहा फुट उंचीचा आहे. जमिनीपासून साडेदहा फुट उंचीच्या आणि 7 x 3 या आकाराच्या चौथऱ्यावर हा पुतळा उभारण्यात आला आहे. कुपवाडा इथल्या भारतीय सैन्य दलाच्या छावणीत या पुतळ्याचं भूमीपूजन भारतीय सेनेतील 'राष्ट्रीय रायफल्स'च्या 41 व्या बटालीयनचे (मराठा लाईट इन्फ्रंटरी) कमांडिंग ऑफीसर कर्नल नवलगट्टी आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समितीचे अध्यक्ष अभयराज शिरोळे यांच्या हस्ते 20 मार्च 2023 ला पार पडलं होतं. नवीन तंत्रज्ञानानं बनविलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा पुतळा जम्मू-काश्मीरमधील प्रतिकूल हवामानात दिर्घकाळ तग धरेल, असा बनवण्यात आला आहे.
राज्यपालांनी केलं होतं पुतळ्याचं पूजन : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं पूजन राज्यपाल रमेश बैंस यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत 20 ऑक्टोबरला राजभवन इथं झालं होतं. त्यानंतर शिवाजी महाराजांचा हा पुतळा कुपवाडाच्या दिशेनं रवाना झाला होता. मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महाराष्ट्र शासन यांच्या सहकार्यातून 'आम्ही पुणेकर' या संस्थेतर्फे हा पुतळा उभारण्यात आला आहे.
हेही वाचा :