मुंबई - भाजपने सत्ता स्थापनेस नकार दिल्यानंतर शिवसेनेने सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. मुख्यमंत्री हा शिवसेनेचाच होणार असल्याचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केले आहे. मात्र, शिवसेना मुख्यमंत्री पदासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) तून बाहेर पडणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शिवसेना ही केंद्रात भाजपबरोबर सत्तेत आहे. शिवसेनेला जर राज्यात सत्ता स्थापन करायची असेल तर प्रथम भाजपसोबत असलेली युती त्यांना तोडावी लागेल. केंद्रात शिवसेनेला भाजपने एक मंत्रीपद दिले आहे. शिवसेनेच्या अरविंद सावंत यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रीपदाचा कारभार सोपवला होता. सेना भाजपची युती तुटल्यास सावंतांना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे.
शिवसेना काँग्रेस, राष्ट्रवादीची 'ती' अट मान्य करणार का?
काँग्रेससह राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनाला अट घातली आहे. शिवसेनेने प्रथम भाजपशी असलेले नाते तोडावे. सेनेने केंद्रातील मंत्रीपदाचा राजीनामा देऊन भाजपशी असलेली युती तोडावी अशी अट दोन्हीही पक्षाने घातली आहे. आता ही अट सेना मान्य करणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
अरविंद सावंतांची राजीनाम्याची तयारी
उद्धव ठाकरेंनी सांगितल्यास मी मंत्रीपदाचा राजीनामा देण्यास तयार असल्याचे वक्तव्य अरविंद सावंत यांनी केले. त्यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.
एनडीएचे संख्याबळ होणार कमी?
शिवसेनेने जर भाजपसोबतची युती तोडली तर एनडीएचे केंद्रातील संख्याबळ कमी होईल. मात्र, भाजपकडे बहुमत असल्यामुळे केंद्रात त्याचा फार काही परिणाम होणार नाही. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राज्यातील ४८ जागांपैकी शिवसेनेला १८ जागा मिळाल्या होत्या. तर भाजपला २३ जागा मिळाल्या होत्या. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळाले होते. त्यांना ३०३ जागा मिळाल्या होत्या. तर एनडीएला ३५० जागा मिळाल्या होत्या. आता जर शिवसेनेने युती तोडली तर एनडीएचे संख्याबळ कमी होणार आहे.