मुंबई - केवळ दोन अपवाद वगळता शिवसेनेच्या स्थापनेपासून दरवर्षी शिवाजी पार्क येथे लाखो शिवसैनिकांच्या साक्षीने दसरा मेळावा होतो. मात्र, यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पहिल्यांदाच हा मेळावा शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाचे प्रसारण सोशल मीडियावर केले जाणार असल्याचे शिवसेनेकडून सांगण्यात आले आहे. शिवसेनेची सत्ता राज्यात आल्यावर हा मेळावा होत असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाचा मेळावा शिवाजी पार्क मैदानात घेतला. चाळीस वर्षांंहून अधिक काळ हे मैदान बाळासाहेब ठाकरे यांनी गाजवले होते. त्यांच्यानंतर याच मैदानात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे दसरा मेळावा घेत आहेत. आतापर्यंत पावसामुळे एकदा आणि अन्य एका कारणाने दुसऱ्यांदा, असा दोनवेळा शिवाजी पार्कवर दसरा मेळावा झाला नव्हता. दोन्ही वेळी मेळावा रद्द करण्यात आला होता. मात्र, यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने दरवर्षी शिवाजी पार्क मैदानात होणारा शिवसेनेचा भव्यदिव्य 'दसरा मेळावा' शिवाजी पार्क परिसरातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात होणार आहे.
५० जणांच्या उपस्थितीत सोहोळा..
सोशल डिस्टन्सिंगचे सर्व नियम पाळून फक्त ५० जणांच्या उपस्थितीत हा सोहोळा होणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सायंकाळी ६.३० वाजता सहपरिवार शिवाजी पार्क येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला मानवंदना देतील, आणि ठीक ७.०० वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात भाषण सुरू करून शिवसैनिकांना संबोधित करतील.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय बोलणार?
राज्यात शिवसेनेची सत्ता आल्यावर हा पहिलाच मेळावा असल्याने उद्धव ठाकरे काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या मेळाव्याला शिवसेनेचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक व प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाचे प्रसारण सोशल मीडियावर केले जाणार असून त्याद्वारे लाखो शिवसैनिक या मेळाव्यात सहभागी होतील, असे शिवसेनेकडून सांगण्यात आले.
हेही वाचा- हनिमूनला नातेवाइकांच्या पैशावर जाताय? मग एकदा हे वाचाच...