मुंबई : देशद्रोहाचा कायदा रद्द करण्याचा प्रस्ताव आहे. त्यावरुन आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी चांगलाच हल्लाबोल केला आहे. प्रदीप कुरुलकरने पाकिस्तानला गोपनीय माहिती पुरवली, मात्र त्याच्यावर देशद्रोहाचा आरोप लावला नाही. सरकारने देशद्रोहाचा कायदा कुरुलकरला वाचवण्यासाठी काढून टाकण्याचा निर्णय घेतला का, असा सवालही संजय राऊत यांनी यावेळी केला.
नवाब मलिक यांना जामीन मिळाल्याने आनंद : नवाब मलिक यांना 16 महिन्यांनी जामीन मिळाला आहे. नवाब मलिकांना मेडिकल ग्राउंडमुळे जामीन मिळाला आहे. त्यामुळे आम्हाला सर्वांना आनंद आहे. विरोधकांना जामीन मिळत नाही, हे सर्व कारस्थान असल्याचा हल्लाबोलही संजय राऊत यांनी यावेळी केला.
ब्रिटिशांपेक्षा भयंकर कायदे निर्माण केले : केंद्र सरकारने देशद्रोहाचा कायदा संसदेच्या पावसाळी अधिवेशनात रद्द केला. सरकारने ब्रिटिशकालीन कायदा रद्द केला, मात्र त्या कायद्याला मागे टाकणारे कायदे वापरून तुम्ही राजकीय विरोधकांना अडकवल्याचा आरोपही संजय राऊत यांनी यावेळी केला. राजकीयदृष्ट्या भविष्यात त्रास होईल, अशा विरोधकांना तुम्ही तुरुंगात टाकत आहात. देशद्रोहाचा कायदा रद्द केला याचे कौतुक सांगू नका. ब्रिटिशांपेक्षा भयंकर कायदे आपण निर्माण केले आहेत, असा हल्लाबोलही संजय राऊत यांनी यावेळी केला. ते कायदे राजकीय विरोधकांना जेरीस आणण्यासाठी तुम्ही वापरत आहात. जे तुमच्या पक्षात येतात त्यांना वॉशिंग मशीनमध्ये धुवून घेता, अशी टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.
तुरुंगाच्या वाटेवरच्यांना मंत्री केले : तुरुंगाच्या वाटेवर असलेल्या नेत्यांना तुम्ही भाजपमध्ये घेऊन मंत्री केल्याची टीका संजय राऊत यांनी केली. विरोधकांना नामोहरम करण्याचे काम सध्या सुरू आहे, असेही संजय राऊत यांनी यावेळी सांगितले. राजस्थानमध्ये पुन्हा एकदा अशोक गेहलोत यांच्या नेतृत्वात काँग्रेसचे सरकार येणार आहे. पैशाच्या जोरावर आणि केंद्रीय यंत्रणेच्या जोरावर सरकार पा तोडणे हा देखील एक प्रकारे देशद्रोहासारखा अपराध असल्याची टीकाही संजय राऊत यांनी यावेळी केली.