मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. दुसरीकडे यावरून राजकारण देखील सुरू आहे. याच कारणावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांवर बाण सोडला आहे. 'सगळेच या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्याला साथ द्या. राजकारण करू नका. महाराष्ट्रात ऑक्सिजनशिवाय कुणाचाही बळी गेला नाही. उत्तर प्रदेशात, दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. अशाप्रकारचे घाणेरडे आरोप विरोधकांनी करू नये', असा सल्ला राऊत यांनी विरोधकांना दिला आहे.
‘सध्या परिस्थिती काय याचे भान विरोधकांनी ठेवणे गरजेचे आहे. एकमेकांचे दोष काढणं योग्य नाही. मुंबईसह राज्यात कोरोनावर नियंत्रण येत आहे. त्यामुळे राजकारण करण्याची गरज नाही. सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे’, असे राऊत यांनी म्हटले आहे.
जनतेच्या हिताचा निर्णय सरकार घेईल-
:जनतेच्या हिताचा निर्णय सरकार घेईल. कोणत्याही राजकारणाशिवाय हा निर्णय घेतला जाईल. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मजबुतीनं काम करत आहेत. रुग्णांचा जीव वाचवणं हे आपलं प्राधान्य आहे', असंही ते म्हणाले.
दुसऱ्या राज्याची तुलना महाराष्ट्राशी करू नये-
'महाराष्ट्रात ऑक्सिजनशिवाय कुणाचाही बळी गेला नसून उत्तर प्रदेशात, दिल्लीत ऑक्सिजनचा तुटवडा आहे. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटचा आरोप पूर्णपणे चुकीचा आहे. अशाप्रकारचे घाणेरडे आरोप विरोधकांनी करू नये. मी यूपी, बिहार आणि दिल्लीची महाराष्ट्राशी तुलना करत नाही. पण या राज्यांमध्ये जाऊन पाहा, त्या तुलनते महाराष्ट्र निश्चितच चांगलं काम करत आहे', असेही राऊत म्हणाले.