मुंबई - महाराष्ट्रातील मोफत कोरोना लसीकरण मोहिमेसाठी खासदार राहुल शेवाळे यांनी आपले एका महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'त जमा केले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी शेवाळेंनी भेट घेतली. यावेळी एक लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द केला.
लोकप्रतिनिधी नात्याने खारिचा वाटा
देशभरात 18 वर्षांवरील नागरिकांचे मोफत कोरोना लसीकरण करण्याचा निर्णय केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वी जाहीर केला. या निर्णयानुसार, केंद्राकडून महाराष्ट्राला कोरोना लसींचा साठा उपलब्ध होत आहे. मात्र, काही प्रमाणात राज्य सरकारला कोरोना लशींची खरेदी करणे अनिवार्य आहे. "केंद्र सरकारकडून कोरोना लसींचा साठा मोफत उपलब्ध होत असला तरीही राज्यातल्या जनतेचे मोफत लसीकरण वेगाने करण्याचे मोठे आव्हान राज्य सरकारसमोर आहे. यासाठी यंत्रणेवर मोठा खर्च करावा लागेल. तसेच राज्य सरकारला काही प्रमाणात लशींची खरेदी करणे अनिवार्य आहे. आधीच गेल्या वर्षभरापासून कोरोना संकटामुळे राज्याच्या तिजोरीवर मोठा ताण पडलेला आहे. या पार्श्वभूमीवर, लोकप्रतिनिधी या नात्याने खारीचा वाटा उचलावा, या भावनेने माझे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'त जमा करण्याचा निर्णय घेतला" अशी प्रतिक्रिया खासदार शेवाळे यांनी दिली आहे.
यापूर्वीही केली मदत
कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये इतर खासदारांप्रमाणे राहुल शेवाळेंनेही आपला दोन वर्षांचा विकासनिधी 'पीएम केअर फंडा'साठी दिला होता. तसेच कोरोनाच्या पहिल्या लाटेतही अशाच रितीने एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहाय्यता निधी'मध्ये जमा केले होते. केरळमधील महापूर, कोल्हापुरातील प्रलयावेळीही असाच पुढाकार खासदार शेवाळेंनी घेतला होता.
हेही वाचा - राम मंदिर जमीन खरेदीत घोटाळा 'महामाप'; न्यायालयीन चौकशी करावी - प्रियांका गांधी