मुंबई - कोरोना विरोधातील लढाईसाठी शिवसेना खासदारांनी एक महिन्याचे वेतन यापूर्वीच मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिले आहे. कोरोना विरोधातील या लढाईत खासदार राहुल शेवाळे व खासदार अरविंद सावंत यांनी प्रत्येकी 1 कोटींचा निधी दिला आहे. आपल्या खासदार निधीतून (MP LAD फंड) एक कोटींचा निधी दिला आहे. मुंबई शहर आणि उपनगरांतील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी हा निधी वापरला जावा, अशी लेखी विनंती खासदार शेवाळे यांनी संबंधित यंत्रणेकडे केली आहे.
लोकसभा सचिव आणि खासदार निधीचे नियमन करणाऱ्या समिती प्रमुखांना लिहिलेल्या या पत्रात, खासदार शेवाळे यांनी कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आपण हा निर्णय घेत असल्याचे स्पष्ट केले आहे. 1 कोटी रुपयांचा निधी अरविंद सावंत यांनी मुंबईतील कस्तुरबा, सेंट जॉर्ज व गोकुळदास तेजपाल (जी.टी.) रुग्णालयांना व्हेन्टिलेटर्स पुरविण्यासाठी वितरित केला आहे. शेवाळे हे मुंबईतील नाका कामगार, घरकाम करणाऱ्या महिला आणि इतर कामगारांना वेळोवेळी धान्यवाटप करण्याचे काम अव्याहतपणे करत आहेत.