मुंबई - 'मुख्यमंत्री फक्त आणि फक्त शिवसेनेचाच होणार. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंना खोटे ठरवण्याचा प्रयत्न होत आहे. भाजप दिलेला शब्द का पाळत नाही? सरकार स्थापनेचा निर्णय महाराष्ट्रातील जनतेच्या मतानुसार होणार,' असे शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. 'शपथग्रहण होणार आणि ग्रहण सुटणार. आता महाराष्ट्राचे राजकीय चित्र बदलत आहे. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्याही वाढत आहे. शरद पवारांबरोबर कोण-कोण बोलत आहे हे माहीत आहे. जर मी शरद पवारांबरोबर बोललो तर तो अपराध झाला का? असा सवाल त्यांनी केला आहे. शरद पवार देशाचे नेते आहेत. त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात आमदार आहेत. आम्ही इतर पक्षांशी संपर्क करत असल्यामुळे ज्यांच्या पोटात दुखतंय तेही कसा काय इतर पक्षांनी संपर्क करत आहेत,' असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी भाजपला लावला.
शिवसेनेची लढाई न्याय अधिकार आणि सत्यासाठी आहे. सर्वांना सत्तेची हाव आहे, त्यांना खुर्च्या सोडायच्या नाहीत, अशा टोलाही त्यांनी भाजपला लगावला. सत्य काय आहे हे जनतेला माहीत आहे. कोण खोटे बोलत आहे हे सर्वांना माहीत आहे. शिवसेनेने 'वेट अँड वॉच'ची भूमिका घेतली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांकडून अजूनही संपर्क करण्यात आला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
काल (सोमवारी) सांयकाळी शिवसेना नेते रामदास कदम व संजय राऊत यांनी राज्यपालांची भेट घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणाचा चेहरामोहरा बदलला पाहिजे, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. शरद पवारांच्या सोनिया गांधी यांच्या भेटीदरम्यान काय घडले यावर बोलताना राऊत म्हणाले शरद पवार हे राष्ट्रीय नेते असून त्यांना राज्यात स्थिर सरकार यावे असे वाटते. अशाप्रकारे शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनाही हेच वाटते, असे ते म्हणाले.
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील घडामोडीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली याविषयी मला काहीएक माहिती नाही. मी पक्षाच्या हितासाठी बोलतो. कोणीही माझ्यावर कोणत्याही माध्यमातून टीका करू देत, राज्यातील जनतेला सर्व माहीत आहे. आणि राज्याला निवडणुकीच्या नंतर लागलेले ग्रहण लवकरच संपणार असून नवीन सरकार स्थापन होईल असा विश्वास व्यक्त केला.