मीरा भाईंदर(ठाणे) - राज्यात मंदिरे उघडण्यावरून भाजपचे नेते आक्रमक झाले आहेत. राज्यपाल भगसिंग कोश्यारी यांनी देखील मुख्यमंत्री यांना हिंदूत्वाची आठवण करून देत पत्र लिहून भाजप नेत्यांची मंदिरे उघडण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कशालाच दाद दिली नाही. त्यानंतर भाजप आमदार भातखळकरांनी ठाकरेंच्या हिंदूत्वावर बोट ठेवत नवरात्रीत काळात रामलीला कार्यक्रमास परवानगी देण्याची मागणी केली होती. त्यावर शिवसेनेचे प्रवक्ते आमदार प्रताप सरनाईक यांनी रामाच्या नावाने किती वर्षे राजकारण करणार? असा सवाल करत भातखळकरांचा खरमरीत समाचार घेतला आहे.
राज्यातील मंदिरे सुरू करण्याच्या मागणीबरोबरच नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर रामलीला कार्यक्रमला परवानगी द्या, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. यावर शिवसेना आमदार प्रवक्ते प्रताप सरनाईक भातखळकरांच्या या मागणीचा समाचार घेताना म्हणाले की, मुंबईसह देशामध्ये कोरोना अजून संपलेला नाही, काळजी घ्या असे आवाहन पर्वाच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. मात्र, भाजपचे नेते मंदिरे उघडा या मागणीसाठी आंदोलने करत आहेत. हळूहळू सर्व सुरू होत आहे मंदिरे देखील खुली होतील मात्र कोरोचा प्रार्दुभाव पाहता सध्या शक्य नाही आहे.
केवळ राजकारणासाठी भाजपचे आमदार भातखळकर आता रामलीला कार्यक्रमाला परवानगी देण्याची मागणी करत आहेत. मात्र, या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात गर्दी होते. हे त्याांना कळत नसेल तर दुर्दैव आहे. भाजपचे लोक रामाच्या नावांनी किती वर्षे राजकारण करणार..? फक्त धर्माच्या नावाखाली राजकारण सुरू आहे. रामाच्या नावाने जनतेने मतं तुम्हाला दिली आहेत. निदान आता कोरोनाच्या काळात तर भाजप नेत्यांनी शांत बसावे. नाहीतर जनता त्यांना कदापी माफ करणार नाही नसल्याची टीकाही सरनाईक यांनी केली.