मुंबई - बाळासाहेब थोरात यांना महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व मिळाले आहे. पण, आता नेतृत्वासाठी पक्षच उरला नसल्याचे म्हणत शिवसेनेने मुखपत्र सामनातून काँग्रेसवर टीका केली. चव्हाण गेले आणि थोरात आले, काय फरक पडणार? काँग्रेसला राजकीय भविष्य उरले नसल्याचेही म्हणत सेनेने काँग्रेसवर निशाणा साधला. थोरातांबरोबर काँग्रेसने ५ कार्याध्यक्षांची निवड करुन जातपंचायत आणली असल्याचेही सेनेने म्हटले आहे.
अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपादाचा देऊन महिना उलटून गेला तरी नवा प्रदेशाध्यक्ष मिळत नव्हता. अखेर आता त्या पदावर बाळासाहेब थोरात विराजमान झाले, पण त्यांच्या दिमतीला महाराष्ट्रात ‘जात’निहाय पाच कार्याध्यक्षही पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत. म्हणजे महाराष्ट्रात काँग्रेसने एक नव्हे, तर सहा अध्यक्ष नेमले असल्याचे सेनेने म्हटले आहे. काँग्रेस पक्षाला अद्यापही राष्ट्रीय अध्यक्ष मिळालेला नाही, पण महाराष्ट्राला मात्र, अखेर नवा प्रदेशाध्यक्ष मिळाला आहे. अशोक चव्हाण यांच्या रिकाम्या जागी बाळासाहेब थोरात यांची नेमणूक करण्यात आली आहे. मात्र, काय फरक पडणार? काँग्रेसचे आभाळ फाटून पार जमीनदोस्त झाले आहे. पक्ष जमिनीवर शिल्लक नसल्याचेही सेनेने म्हटले आहे.
काँग्रेसला राजकीय भविष्य उरले नाही
काँग्रेसला राजकीय भविष्य उरले नाही. काँग्रेसची विचारधारा, संस्कृती असलेले नेते रोजच शिवसेना किंवा भाजपमध्ये विलिन येत आहेत. काँग्रेसचा वाडा आता ओसाड पडला आहे. काँग्रेसला या अवस्थेतून बाहेर काढण्याचे मोठे आव्हाण बाळासाहेब थोरातांसमोर असल्याचे सेनेने म्हटले आहे.
अद्यापही काँग्रेसच्या डोक्यात जात, धर्म
काँग्रेसच्या डोक्यातून अद्यापही जात व धर्माचे खूळ जाण्यास तयार नाही. बाळासाहेब थोरात यांची प्रदेशाध्यपदी निवड झाली. मात्र, त्यांच्याबरोबर काँग्रेसने ५ कार्याध्यक्षांची जात पंचायत नेमली आहे. विदर्भातील नितीन राऊत (अनुसूचित जाती), विदर्भाच्याच यशोमती ठाकूर (इतर मागासवर्गीय), मुजफ्फर हुसेन (मुस्लिम), विश्वजित कदम (मराठा), बसवराज पाटील (लिंगायत) अशी ही जात पंचायत काँग्रेसने नेमली आहे. लोकसभा निवडणुकीत यापैकी एकही समाज काँग्रेसच्या मागे उभा राहिलेला दिसत नसल्याचे सेनेने म्हटले आहे .
घासून गुळगुळीत झालेले गोटेच पुन्हा पदावर
काँग्रेसची धुरा सांभाळून पक्ष पुढे नेईल असे नेतृत्व आता काँग्रेसमध्ये उरले नाही. तेच तेच घासून गुळगुळीत झालेले ‘गोटे’ पुनः पुन्हा पदावर बसवले जात असल्याचे म्हणत सेनेने काँग्रेसवर बोचरी टीका केली आहे. महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक तीन महिन्यांवर आहे. बाळासाहेब थोरात यांना एक मजबूत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसला उभे करण्याचे मोठे आव्हाण आहे. थोरात हे काँग्रेसचे जुणे जाणते नेते आहेत. स्वच्छ प्रतिमेचे, सहरकारातील ज्ञानी आहेत. त्यांच्यारुपाने महाराष्ट्र काँग्रेसला नेतृत्व मिळाले पण, नेतृत्वासाठी पक्ष उरला आहे काय? असा सवालही सेनेने केला आहे.