मुंबई - राज्यातील काही पोलीस अधिकाऱ्य़ांनी सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. तो प्रयत्न वेळीच हाणून पाडला, असे वक्तव्य केलेच नसल्याचे स्पष्टीकरण गृहमंत्री अनिल देशमुख यांनी रविवारी पत्रकार परिषद घेऊन दिले होते. त्यानंतर शिवसेनेने त्यांच्या तोंडी असे विधान टाकण्याचे धाडस केले कोणी? ज्या कोणी हे धाडस केले तेच लोक सरकारला कमजोर करण्याचा प्रयत्न करीत असल्याची टीका केली आहे. तसेच अशा प्रवृत्तींवर निगराणी ठेवणे हे गृहखात्याचे काम आहे. ते त्यांनी चोख पार पाडले तर सरकारचे भवितव्य उत्तम असल्याचा सल्ला देखील मुखमत्र सामनाच्या अग्रलेखातून गृहमंत्र्यांना दिला आहे.
काय म्हटले आहे सामनात-
काही अधिकारी आजही उच्चपदी विराजमान आहेत. जे ठाकरे सरकार येऊ नये म्हणून उघड प्रयत्न करूनही आपले कोणी काय वाकडे केले या थाटात ते वावरत असतात. सरकारला धोका असतो तो याच प्रवृत्तीपासून. सरकार पाडणे म्हणजे काय असते? सरकारसंदर्भातले काही विषय गुप्तपणे विरोधकांकडे पोहोचवणे व सरकारच्या विरोधात प्रशासकीय यंत्रणेत अविश्वासाचे वातावरण निर्माण करणे. सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न कोणताही अधिकारी करीत नाही. ते फक्त मनसुबेच ठरतात, पण अस्तनीत निखारे हे असतातच. सावधगिरी बाळगावीच लागेल!
भारतीय जनता पक्षाचे लोक महाराष्ट्र सरकार पाडण्याचा प्रयत्न काल करत होते. आज-उद्याही करतील. हे सगळे ठीक, पण राज्यातील काही बडे पोलीस अधिकारी सरकार पाडण्याचा प्रयत्न करीत होते किंवा आहेत असे एक विधान गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या तोंडी घातले गेले.
सरकार बदलताच भलेभले अधिकारी टोप्या फिरवतात. उगवत्या सरकारला त्यांना नमस्कार करावाच लागतो. हे फक्त महाराष्ट्रातच नाही, तर देशभरात सर्व स्तरांवर सुरू असते. महाराष्ट्रातील प्रशासन हे देशात उत्तम आहे. ज्याला आपण ‘प्रोफेशनल’ म्हणतो अशा पद्धतीचा अधिकारी वर्ग महाराष्ट्राला लाभला आहे. सरकार बदलण्याची व पाडण्याची क्षमता त्यांच्यात नाही. राज्याची ती परंपरा नसल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे. मात्र, काही अस्तनीतले निखारे असे मनसुबे बाळगत असल्याचेही सांगत सरकार पाडण्याच्या प्रयत्न झाल्याबद्दलची शक्यता शिवसेनेने नाकारली नाही.
फडणवीस सरकार जाणार नाही या भ्रमात होते संघधुंदीतील अधिकारी
येथील प्रशासन निवडणुकीआधी आणि नंतर काही काळ होते. ते त्याच भ्रमात तरंगत होते. पाच वर्षे फडणवीस व भाजपने एकछत्री अंमल गाजवला. प्रशासनावर फडणवीस सरकारचा अंमल होता व पुनःपुन्हा आम्हीच येणार या विधानाची धुंदी होती. त्यामुळे पोलीस असतील किंवा मंत्रालय, महसूल खाते एकजात सर्व अधिकारी वर्ग त्याच संघधुंदीत गुंग झाला होता. अनेक महत्त्वाच्या नेमणुका संघ परिवाराच्या शिफारशीने किंवा हस्तक्षेपाने होत असत. ही व्यवस्था यापुढे अशीच निरंकुश सुरू राहणार असेच वातावरण असल्याने पोलीस, नागरी सेवेतले अधिकारी त्याच व्यवस्थेच्या पांगुळगाड्यावर बसून प्रवास करीत होते, अशा टीकेचा फटकाराही काही संघधुंदीतील अधिकाऱ्यांना सामनातून लगावण्यात आला आहे.
सरकार पाडण्याचा वगैरे प्रयत्न करीत होते ते अधिकारी कोण? याहीपेक्षा काही झाले तरी भाजपचेच सरकार बनले पाहिजे असे मानणारे सहानुभूतीदार कोण, ते महत्त्वाचे. राष्ट्रपती राजवट महाराष्ट्रात लादण्याआधी जो पहाटे पहाटे सरकार स्थापनेचा सोहळा पार पाडला त्या गुप्त कटात काही अधिकारी सामील असायलाच हवेत व हे सर्व नाटय़ वरिष्ठ प्रशासकीय पातळीवर झाले, असल्याचा आरोपही सामनातून करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांच्या मर्जीत राहता यावे म्हणून काही पोलीस अधिकारी लहान पक्षांच्या आमदारांना व अपक्षांना वेगवेगळय़ा पद्धतीने जाळय़ात ओढत होते. आमदारांचे कच्चे दुवे शोधून पहाटेच्या मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करीत होते. गुप्तचर खात्यानेही याकामी विशेष कामगिरी बजावली हे सत्यच आहे. बहुमत सिद्ध करून द्यायची जबाबदारी आपल्या शिरावर घेऊनच काही अधिकारी राबत होते, पण त्यांचे काहीच चालले नसल्याचेही शिवसेनेने म्हटले आहे.