मुंबई- मुंबईत कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. याच दरम्यान पीएम केअर फंडामधून पालिकेला 400 व्हेंटिलेटर मिळाले होते. या व्हेंटिलेटरवरुन पालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपला प्रत्युत्तर म्हणून व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला आहे. तर नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी महापौरांकडून वेगवेगळी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप पालिकेतील भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम केअर फंड सुरू केला. त्यात मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले. नागरिकांनी या केअर फंडमध्ये भरघोस मदत केली आहे. या फंडामधून मुंबई महापालिकेला 400 व्हेंटिलेटर महिनाभरापूर्वी देण्यात आले. गेले महिनाभर हे व्हेंटिलेटर धूळखात पालिका रुग्णालयांमध्ये पडून आहेत. व्हेंटिलेटर नसल्याने रुग्णांचा जीव गेल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. पंतप्रधान यांच्या फंडातून आलेले व्हेंटिलेटर वापरण्यात आले असते तर रुग्णांचा जीव वाचवता आला असता. आज हे व्हेंटिलेटर वापरले नसल्याने जे रुग्णांचे जीव गेले आहेत त्याला पालिका आयुक्त की, पालिकेतील सत्ताधारी जबाबदार आहेत याचे उत्तर द्यावे, अशी मागणी प्रभाकर शिंदे यांनी केली होती.
त्यावर पालिकेकडे स्किल असलेले कर्मचारी नसल्याने हे व्हेंटिलेटर लावण्यात आलेले नाहीत. स्किल असलेल्या कर्मचाऱ्यांचा शोध सुरू आहे. ते आले की हे व्हेंटिलेटर लावण्यात येतील. सध्या ज्या ठिकाणी कर्मचारी आहेत त्याजागी हे व्हेंटिलेटल लावले जातील असे पालिका आयुक्तांनी सांगितल्याचा खुलासा महापौर किशोरी पेडणेकर यांनी केला होता. तर हे व्हेंटिलेटर टप्प्याटप्प्याने पालिकेकडे आले असल्याने टप्प्याटप्प्याने लावले जातील असा खुलासा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला होता. आज पुन्हा महापौर किशोरी पेडणेकर यांनी पंतप्रधान फंडामधून आलेली व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाची असल्याने ती परत पाठवण्याचा विचार सुरू असल्याचे म्हटले आहे.
यावर भाजप संतप्त झाली आहे. महापौर आणि पालिका प्रशासनाकडून करण्यात आलेल्या वेगवेगळ्या खुलास्याबाबत भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच जर पंतप्रधान केअर फंडामधून आलेले व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाचे होते तर त्याचवेळी त्याची तक्रार का केली नाही. ते त्याच वेळी परत का पाठवले नाही, असे प्रश्न उपस्थित केले आहेत. भाजपने व्हेंटिलेटर धूळ खात पडून आहेत हे सत्य समोर आणले त्यामुळे हे असत्य दाखवण्यासाठी व्हेंटिलेटर निकृष्ट दर्जाची असल्याचे महापौर म्हणत आहेत. तसेच नागरिकांची दिशाभूल करण्यासाठी महापौरांकडून वेगवेगळी वक्तव्य केली जात असल्याचा आरोप शिंदे यांनी केला आहे.