मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला यावर्षी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी निधी गोळा करण्यात येणार आहे. राज्यातील शेतकरी दुष्काळाने होरपळत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच यावर्षी राज्याभिषेक सोहळ्याला पहिल्यांदाच काही विदेशी राजदूतही हजेरी लावणार असल्याची माहिती खासदार संभाजीराजेंनी दिली.
६ जूनला रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. या सोहळ्यात शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता दाखवत एका शेतकरी कुटुंबाचा सत्कार करण्यात येणार आहे. तसेच या सोहळ्यास आलेल्या शिवभक्तांना दान देण्यासाठी दानपेट्या ठेवण्यात येणार आहेत. येथे जमा झालेला निधी दुष्काळग्रस्तांसाठी देण्यात येणार असल्याची माहिती शिवराज्याभिषेक आयोजक महोत्सव समितीचे अध्यक्ष आणि खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी दिली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
शिवरायांच्या राज्याभिषेक सोहळ्याला हेन्री ओक्सडन हा तत्कालीन इंग्रज राजदूत उपस्थित होता. त्याच धर्तीवर यावर्षी ग्रीस, चीन, बुल्गारिया, पोलंड, ट्युनेशिया या ५ देशातील राजदूत शिवरायांना अभिवादन करणार आहेत. याच सोहळ्यात पहिल्यांदाच शिवकालीन युद्धकलेचा जागर करण्यात येणार आहे. त्यासाठी दांडपट्टा चालविण्याच्या खेळाचा प्रचार आणि प्रसार करण्याचे आयोजन समितीने ठरवले आहे. यावर्षी अनेक मंडळे यात सहभागी होत आहेत, असेही संभाजीराजेंनी सांगितले.
शिवराज्याभिषेक सोहळ्याला राष्ट्रीय उत्सवाचा दर्जा देण्यात यावा. त्यासाठी राज्य सरकारतर्फे पाठपुरावा केला जाणार असल्याची माहितीही संभाजीराजेंनी दिली. तसेच हा सोहळा प्लास्टिकमुक्त व्हावा, म्हणून आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.