मुंबई - देशाच्या विकासासाठी धनसंपत्ती बरोबच जनसंपत्ती महत्वाची आहे. मी मुख्यमंत्री असलो तरी माझ्याकडे कोणतेचं खातं नाही. पण मी सर्व मंत्र्यांना प्रोत्साहन देतो, असे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले. सत्ता आमच्या डोक्यात जाणार नाही, असेही उद्धव ठाकरे म्हणाले. मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथे शिव छत्रपती क्रीडा पुरस्कार' सोहळा संपन्न झाला. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते.
क्रीडा क्षेत्रातून महाराष्ट्राच्या परंपरेला वैभव मिळवून देणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी क्रीडामंत्री सुनील केदार, क्रीडा राज्यमंत्री आदिती तटकरे, पालकमंत्री अस्लम शेख, खासदार संजय राऊतांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. पंढरीनाथ पठारे यांना क्रिडा क्षेत्रातील २०१८-१९ चा छत्रपती जीवनगौरव पुरस्कार मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत देण्यात आला. खेलो इंडिया राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा 2020 मधील विजेत्यांचाही यावेळी सत्कार करण्यात आला.
मी नशिबवान मुख्यमंत्री आहे, कारण माझे सगळे सहकारी मंत्री उंच स्वप्न पाहणारे असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. क्रिडा पुरस्कारर्थींचे कौतुक झाले पाहीजे. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते १ कोटी ४ लाख मुलींसाठी फिटनेस योजनेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना क्रिडामंत्री सुनिल केदार म्हणाले की, खेळाच्या माध्यमातून जगातील प्रगत देशांनी प्रगतीची शिखरं गाठली. समानता आणि एकतेचे माध्यम हे खेळ असल्याचे केदार म्हणाले.