मुंबई - राज्यात भाजप आणि शिवसेना सत्तासंघर्ष चालू आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार सोमवारी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेणार आहेत. यामुळे राज्यातील राजकारणाची समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. अजित पवार यांनी शरद पवार दिल्लीला जाणार असल्याची माहिती दिली आहे.
हेही वाचा - व्हॉट्सअॅप हेरगिरी प्रकरण : ...तर 'हे' मानवाधिकारांचे घोर उल्लंघन, प्रियंका गांधींचा सरकारवर निशाणा
अजित पवार म्हणाले, महत्त्वाचे नेते वेगवेगळे वक्तव्य करत आहेत. आम्ही सरकार कधी स्थापन होत आहे याची वाट पाहत आहोत. उद्धव ठाकरे पक्षप्रमुख आहेत तेव्हा त्यांचे निर्णय ते घेऊ शकतात. देवेंद्र फडणवीस यांना मोदी, अमित शाह यांना विचारुन लवकरात लवकर सरकार स्थापन करा, असेही पवार म्हणाले.
रविवारी पराभूत झालेल्या उमेदवारांची बैठक पवार साहेबांच्या उपस्थितीत होणार आहे. शरद पवार यांनी नाशिक दौरा केला आहे. अवकाळी पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपले आहे. पिकांचे नुकसान झाले आहे. आम्ही आमच्या मतदारसंघातून त्याबाबत माहिती मागवली आहे. त्याचा आढावा पवार साहेबांना देऊ त्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे अजित पवार म्हणाले.
राष्ट्रपती राजवट लागू करणे इतके सोपे नाही. त्यांना यासाठी केवळ सेनेवर दबाव निर्माण करायचा असल्याने असे विधान करत असल्याचे पवार म्हणाले. यावरुन भाजप जनतेमध्ये संभ्रम निर्माण करत असल्याचेही पवार म्हणाले. शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. दहा हजार कोटी रक्कम सरकारला शेतकऱ्यांना द्यावी लागणार आहे. हजारो एकर शेतीचे नुकसान झाले आहे.