मुंबई : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवसी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शेवटची पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी मागील दोन ते अडीच वर्षात सरकारनं केलेल्या विकासकामाचा पाढा वाचला. तसेच महाविकास आघाडीवर घणाघाती टीका केली. आम्ही विकासकामांचे स्पीड ब्रेकर हटवले, ज्या कामाना स्थगिती देण्यात आली होती ती स्थगिती हटवली आणि विकासकामांना चालना दिली, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला.
महत्त्वाचे प्रकल्प सरकारने पूर्ण केले : पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, "आज प्रचाराचा शेवटचा दिवस आहे. मी राज्यात अनेक सभा घेतल्या. कधी नाही तेवढा प्रतिसाद माझ्या सभांना मिळाला. राज्यात मतदारांमध्ये उत्साहाच आणि आनंदाच वातावरण आहे. महायुती सरकारनं अडीच वर्षात अनेक लोक कल्याणकारी योजना राबवल्या. याच्यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, कौशल्य योजना, लेक लाडकी अशा विविध योजना आणल्या आहेत. तर अनेक विकासकामे, मोठमोठे प्रकल्प सरकारनं राबिवले आहेत. यामध्ये मेट्रो, अटल सेतू, अनेक उड्डाणपूल, मुंबईत काँक्रेटचे रस्ते असे महत्त्वाचे प्रकल्प सरकारने हाती घेऊन पूर्ण केले आहेत.
कापूस, सोयाबीनला हमीभाव देणार : महायुती सरकारमध्ये कुठेही समन्वयाचा अभाव नाही. सरकारनं अतिशय चांगल्या पद्धतीनं कामं केलेली आहेत. परंतु आधीच्या सरकारच्या काळामध्ये अनेक विकासकामाना स्थगिती देण्यात आली होती. पण आम्ही सरकारमध्ये येताच त्या कामातील स्पीड बेकर हटवले आणि कामांना गती दिली. महत्त्वाचं म्हणजे आता आमचं सरकार राज्यात आल्यावर आम्ही सोयाबीन आणि कपाशीला हमीभाव देणार असल्याचं यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सांगितलं.
मातोश्रीतून भरलेली : दुसरीकडं आज केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत, "दिल्लीहून तिजोरी आणली आणि या तिजोरीतून अदानी-मोदी यांचे फोटो दाखवले. 'एक है तो सेफ है' असं मोदी का म्हणतात? मोदींना एकच उद्योगपती पाहिजे दुसरं कोणी नको म्हणून ते 'एक है तो सेफ है' असं म्हणत आहेत, अशी टिका राहुल गांधींनी मोदींवर डागली होती". यावर बोलताना शिंदे म्हणाले की, "त्यांनी दिल्लीतून खाली तिजोरी आणली. मला वाटलं त्यांनी मातोश्रीतून भरलेले तिजोरी आणली. मातोश्रीतून भरलेले तिजोरी आणली असती तर बरं झालं असतं" अशी खोचक टीका, एकनाथ शिंदेंनी राहुल गांधी यांच्यावर केली. आम्ही धारावीमध्ये दोन लाख लोकांना घर देण्याचा प्रयत्न करतोय. पण यांच्यामध्ये आडकाठी आणण्याचं काम महाविकास आघाडी करत आहे. जर त्या दोन लाख लोकांना घर मिळाली तर पुण्याच काम मिळेल. परंतु त्यांचे आशीर्वाद गमावण्याचं दुर्दैवी काम विरोधक करत आहेत, म्हणून धारावी पुनर्वसनाला विरोधक विरोध करत आहेत अशी टीका, शिंदेनी राहुल गांधी आणि विरोधकावर केली.
खरे गद्दार हे उद्धव ठाकरेच : उद्धव ठाकरे हेच खरे गद्दार आहेत, अशी टीका राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंवर केली. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विचारला असता ते म्हणाले की, "राज ठाकरे काही चुकीचे बोलले नाहीत. राज ठाकरे बरोबरच तर बोलले आहेत. आम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे नेत आहोत. पण ज्यांची विचारधारा वेगळे आहे, अशांशी तुम्ही आघाडी केली आणि बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली. त्यामुळं खरे गद्दार हे उद्धव ठाकरेच आहेत, हे राज ठाकरे अगदी बरोबर बोलले आहेत".
"मला हलक्यात घेऊ नका" : "मी माझ्या बापाचं नाव लावतो, आईचं नाव लावतो. परंतु त्यांना स्वतःच्या वडिलांचे नाव घेण्याचाही अधिकार नाही. कारण त्यांनी हिंदुत्वाचा विचार सोडला आहे. बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवले आहेत. बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. त्यांच्या विचार आम्ही पुढे नेत आहोत. मला हलक्यात घेऊ नका, त्यांनी मला घेतलं लाईट, म्हणून मी त्यांना केलं टाईट", असा टोला एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. दरम्यान, 'बटेंगे तो कटेंगेवरून विरोधक गैरसमज पसरवत आहेत. यावरुन महायुतीला कुठेही धोका नाही. बटेंगे तो कटेंगेचा वाकडा अर्थ तुम्ही का काढत आहात. समाजाने एकसंध रहावं. एकोपाने राहावं असा आम्ही प्रचार करत आहेत. पण त्याला काही लोक वेगळा अर्थ देण्याचा प्रयत्न करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
हेही वाचा -