मुंबई - महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचा आज (दि. २५) स्मृतीदिन आहे. स्मृतीदिनानिमित्त त्यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी शरद पवार सकाळी ८ वाजता साताऱ्यातील कराड येथील प्रीती संगमावर जाणार आहेत. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईतच यशवंतरावांना अभिवादन करतील.
कराडच्या प्रीति संगमावरील यशवंतरावांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी दरवर्षी २५ नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांसह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री उपस्थित राहतात. मात्र, सध्या राज्याच्या राजकारणात अभूतपूर्व असा सत्तापेच निर्माण झाला आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. सत्तेचा तिढा कायम होता. त्यामुळे राज्यपालांनी यशवंतरावांना अभिवादन करण्यासाठी कराडच्या समाधीस्थळी यावे, अशी मागणी करण्यात येत होती.
हेही वाचा - छत्तीसगड : दंतेवाडामध्ये माओवाद्यांचा मोठा हल्ला, अनेक वाहने पेटवली
पण, आता देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यामुळे परंपरेनुसार फडणवीसांनी प्रीती संगमावर जाणे क्रमप्राप्त आहे. पण, फडणवीसांनी तेथे न जाण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. ते मुंबईतच यशवंतरावांना अभिवादन करणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी प्रीती संगमावर न जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
हेही वाचा - हिमाचल प्रदेश : चंबा जिल्ह्यात हिमवर्षावामुळे दोन ते तीन इंचाचा बर्फाचा थर
शरद पवार सोमवारी सकाळी ७.१५ वाजता जुहू येथील हेलिपॅडवरून हेलिकॉप्टरने कराडकडे रवाना होणार आहेत. सकाळी ८.१५ ला ते कराडच्या विमानतळावर येतील. कराड विमानतळावरून ते कारने कराडच्या प्रीतिसंगमावर जाऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करतील. प्रीतिसंगमावरील कार्यक्रम झाल्यानंतर वेणूताई चव्हाण स्मारकात सकाळी १० वाजता होणार्या यशवंतराव चव्हाण ट्रस्टच्या विश्वस्तांच्या मिटींगला ते उपस्थित राहतील.
यशवंतराव चव्हाण ट्रस्ट मुंबईच्या कराड केंद्राच्या कार्यकारी परिषदेमध्येही ते सहभागी होणार आहेत. ११.३० ला ते सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजवर आयोजित करण्यात आलेल्या यशवंतराव चव्हाण पुरस्कार प्रदान सोहळ्याला हजेरी लावतील. ज्येष्ठ विचारवंत डॉ. एन. डी. पाटील यांना शरद पवार यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल. त्यानंतर दुपारी १ वा. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ आणि सह्याद्री कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या इमारतीचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होईल. दुपारी ३.३० वाजता सह्याद्री कारखान्यावरील हेलिकॉप्टरने ते मुंबईला रवाना होतील.
यशवंतराव चव्हाण यांचे मानसपूत्र शरद पवार हे राज्यातील सध्याच्या घडामोडींवर सोमवारच्या कराड दौऱ्यात काय बोलणार, याकडे राज्याचे लक्ष लागून आहे