मुंबई : 2 मे रोजी शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून निवृत्तीचा निर्णय जाहीर केला. यानंतर कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीच्या नेत्यांनी राजीनामा मागे घेण्याची मागणी शरद पवारांना केली आहे. यानंतर एक समीती गठीत करण्यात आली होती. त्या समितीची आज मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीत पवार यांचा राजीनामा नामंजूर करण्यात आला आहे. यावर राष्ट्रवादीचे जेष्ट नेते प्रफुल पट्टेल यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी बोलतांना प्रफुल्ल पटेल म्हणाले, शरद पवार यांनी जाहीर केलेल्या समितीची आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात बैठक झाली. त्यात आम्ही आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांच्या, नेत्यांच्या भावना व्यक्त करणारा प्रस्ताव मांडला. तो एकमताने मंजूर करण्यात आला. त्यानुसार शरद पवार यांनी पक्षाध्यक्षपदी कायम राहावे अशी शिफारस करण्यात आली आहे.आम्ही जे काही बोललो ते त्यांनी ऐकून घेतले. यावर पवांरांनी मला विचार करण्यासाठी वेळ हवा असल्याची मागणी केली आहे.
राजीनामा फेटाळला : शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर खळबळ उडाली होती. शरद पवार यांनी अचानक घेतलेला हा निर्णय राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना धक्का देणारा होता. त्यानंतर पुढचा अध्यक्ष निवडण्यासाठी शरद पवार यांनी समिती नेमली. या समितीची आज बैठक झाली. या समितीच्या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा फेटाळला आहे. शरद पवार अध्यक्ष असतील, असा ठराव बैठकीत मंजूर करण्यात आला. यानंतर या समितीच्या नेत्यांनी ‘सिल्व्हर ओक’ येथे शरद पवार यांना आपला निर्णय कळवला आहे. यानंतर शरद पवार विचार करून निर्णय देतील, अशी माहिती राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.
जयंत पाटील यांची प्रतिक्रिया - यावर बोलतांना जयंत पाटील म्हणाले, देशातील विविध नेत्यांचा आग्रह तसेच राज्यातील लाखो कार्यकर्त्यांचा शरद पवारांवर विश्वास आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत शरद पवार यांनीच अध्यक्षपदी राहावे, अशी कार्यकर्त्यांची भूमिका आहे. समितीचा ठराव शरद पवार यांच्या कानावर घातला आहे. 'विचार करून सांगेन,' असे शरद पवार म्हणाले आहेत.
राष्ट्रवादी समोर कोणता पर्याय : शरद पवार निर्णय कधी जाहीर करणार? यावर जयंत पाटल म्हणाले, 'शरद पवार यांनी समितीतील सर्वांचे मत ऐकून घेतले आहे. आम्ही सर्वांनी विनंती केली आहे, लवकरात लवकर निर्णय द्यावा. कारण महाराष्ट्र, देशातील कार्यकर्ते निर्णयाची वाट पाहत आहेत." शरद पवारांनी निर्णय नाकारला तर पर्याय काय असणार? असे विचारले असता जयंत पाटल म्हणाले, 'शरद पवारांशिवाय पर्याय नाही, यावर कोणतीही चर्चा झाली नाही.'
छगन भुजबळ यांची प्रतिक्रिया - राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ म्हणाले की, 'पवार यांनीच अध्यक्षपदी कायम राहावे, असा प्रस्ताव बैठकीत मांडला जाणार आहे. आम्ही त्यांना राजीनामा मागे घेण्याची विनंती करू. त्यांनी ऐकले नाही तर, आम्ही त्यांच्या घरासमोर उपोषण करू.'
शरद पवार ही राष्ट्रवादीची महाराष्ट्रात, महाराष्ट्राबाहेरची ओळख आहे. महाराष्ट्राला, देशाला शरद पवारांची गरज आहे. देशातील विरोधी पक्षांना एकत्र आणण्याची ताकद शरद पवार यांच्यात आहे. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्षच राहावे, असा आमचा आग्रह आहे," असे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.
राजीनामे मागे घेण्यासाठी घोषणाबाजी : कार्यकर्त्यांनी राजीनामे मागे घेण्यासाठी घोषणाबाजी केली. आता राष्ट्रवादीच्या केंद्रीय अध्यक्षपदी सुप्रिया सुळे यांची निवड होण्याची शक्यता आहे. सुप्रिया सुळे या गेल्या पंधरा वर्षांपासून केंद्रीय पातळीवर खासदार म्हणून कार्यरत आहेत. या पदासाठी छगन भुजबळ यांच्या नावाचीही चर्चा आहे. राष्ट्रवादीचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे. अजित पवार यांनाही अध्यक्षपदी घोषित केले जाऊ शकते, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादीचा अध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजीनामा फेटाळल्यानंतर जल्लोष : शरद पवार यांचा राजीनामा समितीने फेटाळल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. शरद पवार यांचा राजीनामा समितीने फेटाळल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये मोठा आनंद झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणाबाजीही केली. शरद पवार यांच्या राजीनाम्यानंतर आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष निवड समितीची बैठक पार पडली. या बैठकीत शरद पवार यांचा राजीनामा एकमताने फेटाळण्यात आला. त्यामुळे कार्यकर्त्यांना आनंद झाला. त्यांनी राजीनामा मागे घ्यावा, अशी सर्वांची मागणी होती. अनेक कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले, अनेक ठिकाणी आंदोलनेही झाली. त्यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्ते भावूक झाले होते. राजीनामा मागे घ्यावा, अशी मागणी पक्ष कार्यकर्त्यांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. एका कार्यकर्त्याने कार्यालयाबाहेर आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचीही माहिती समोर येत आहे. यावेळी कार्यकर्त्यांनी कोण आला, कोण आला, महाराष्ट्राचा वाघ आला अशा घोषणाही दिल्या.
वाचा महत्वाच्या ठळक बातम्या -
- Sharad Pawar Resign Rejected : शरद पवारांचा राजीनाम्याचा निर्णय गुलदस्त्यात, राजीनामा एकमताने फेटाळला
- Sanjay Raut On Sharad Pawar : निवड समितीचा निर्णय अपेक्षित होता, शरद पवार यांच्याशिवाय दुसरा पर्याय नाही - संजय राऊत
- Sharad Pawar Resign: शरद पवारांनी विचार करण्यासाठी वेळ मागितला-प्रफुल पटेल
- Sharad Pawar Resign: शरद पवार यांचा राजीनामा समितीने फेटाळल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये जल्लोष
- Proposal to Reject Sharad Pawar Resignation : शरद पवार यांनी आपला कार्यकाळ पूर्ण करावा-प्रफुल पटेल